पुणे : कंपनी सोडल्यानंतर चार जणांवर जुन्या कंपनीने डाटा चोरीचा आरोप केला. त्याच्या चौकशीसाठी नाशिक येथून चौघे कोथरूड पोलिस ठाण्यात आले. पोलिस ठाण्यात जुन्या कंपनीचे लोक आणि या चौघांमध्ये झालेल्या संभाषणानंतर त्यांच्यातील वाद मिटले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यातून परत कारने जात असलेल्या चौघा तरुणांना वाटेत गाठून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत संदीप कैलास लवाटे (वय २८, रा. गणेशनगर, मनमाड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पौड रोडवरील साई प्रतिष्ठान चौकात सोमवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमरास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप लवाटे हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना पोलिसांनी तेथे जाऊन फिर्याद घेतली. ते सध्या नाशिक येथील एका कंपनीत ४ महिन्यांपासून काम करत आहेत. यापूर्वी ते कोथरूड येथील एका कंपनीत नोकरीला होते. नाशिक येथील योगेश दुसाणे, प्रवीण गायकवाड, सचिन केदार हे सुद्धा पुण्यातील कंपनीत नोकरीस होते. मार्च २०२५ मध्ये लवाटे यांनी नोकरी सोडली.
त्यांच्याबरोबर योगेश दुसाणे, प्रवीण गायकवाड व सचिन केदार यांनीही शहरातील कंपनी सोडून नाशिक येथील एका कंपनीत स्वीकारली. तर, योगेश दुसाणे यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. फिर्यादी व इतरांना कोथरूड पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार ते २१ जुलै रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आले होते. त्यांच्यावर पूर्वीच्या कंपनीतील डेटा चोरून दुसऱ्या कंपनीला दिला म्हणून तक्रार केली होती. यावेळी कंपनीतील लोकही उपस्थित होते. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीचे समाधान झाले. त्यानंतर ते सर्व जण नाशिकला परत जात होते.कारमधून ते साई प्रतिष्ठान चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी एका दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर एकाने पुढे येऊन चालक योगेश दुसाने यांना बाहेर काढून मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्याने फिर्यादी यांना कारमधून बाहेर ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने धारदार हत्याराने डोक्यात मारले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने योगेश दुसाने याच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून जखमी केले. आणखी एकाने सचिन केदार आणि प्रवीण गायकवाड यांना कारमधून बाहेर काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले. त्यातील एकाला फिर्यादी यांनी ओळखले असून, तो पूर्वीच्या नोकरीला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेख करत आहेत.