पुणे : गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वटवृक्ष कॅपिटलच्या नरेंद्र धर्माधिकारी (रा. यशवंतनगर, शिवणे) याच्याविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संदीप कुलकर्णी (३९, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० एप्रिल १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यानच्या कालावधीत प्रभात रस्ता परिसरात घडला आहे. कुलकर्णी यांच्यासह इतरही चार ते पाच जणांची फसवणूक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुलकर्णी यांच्यासोबत आरोपी धर्माधिकारी याचा परिचय प्रभात रोड येथील एका हॉटेलमध्ये व्यावसायिक मार्गदर्शनासंदर्भाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत झाला होता. त्यावेळी धर्माधिकारी याने फिर्यादींना त्यांच्या वटवृक्ष कॅपिटल नावाच्या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखविले. धर्माधिकारीच्या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादी आणि इतर चार ते पाच जणांनी ४० लाख ८९ हजार रुपये आर्थिक गुंतवणूक केली. परंतु ठरल्याप्रमाणे धर्माधिकारी याने फिर्यादींना नफा तसेच गुंतवणूक केलेले पैसेदेखील परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत करीत आहेत.