पुणे : औंध परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने दुकान मालकाला मारहाण केली. आम्ही इथले भाई, दुकान बंद करुन टाक असे म्हणत दुकानात घुसून टोळक्याने दुकानाची तोडफोड केली. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.अधिकच्या माहितीनुसार, गोपाल राव असे मारहाण झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. टोळक्याने दुकानमालकाच्या नाक, गाल आणि छातीवर जोरदार मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चतुरश्रृंगी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास चतुरश्रृंगी पोलिसांकडून सुरु आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर चतुरश्रृंगी पोलिसांकडून चार आरोपींचा शोध सुरु आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल. असे चतुरश्रृंगी पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. येथील स्थानिक नागरिकांकडून या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.