पुणे : रेल्वेत चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपयांचे २० मोबाइल जप्त केले आहेत. बुद्धराज मोरपाल बागडी (३२, रा. डिलोदा, ता. जि. बारा, राजस्थान) आणि अमरलाल हंसराज बागडी (२२, रा. बडा का बालाजी, ता. जि. बारा, राजस्थान), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडी टाकून राहणाऱ्या या दोघांच्या झोपडीतून २० मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
ऋतुराज दिलीपराव काटकर (२६, रा. जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांचे मित्र संजय मडीया डिन्डोड हे ३० ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास प्लॅटफॉर्म १ वर उभ्या असलेल्या दानापूर एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चढत असताना त्यांचा मोबाइल कोणीतरी चोरून नेला होता. त्याची फिर्याद लोहमार्ग पोलिसांकडे दाखल झाली.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात काही जण झोपडी टाकून राहतात. ते पुण्यातील लोकांचे मोबाइल चोरून आपल्याकडे ठेवत आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक सिग्नल चौकात गेले. त्यांना पाहून चोरटे पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांच्या झोपडीतून १ लाख ९० हजार ४०० रुपयांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे २० मोबाइल जप्त करण्यात आले.
या दोघांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी जुन्या बाजारातून कोणत्याही प्रकारची खात्री न करता मोबाइल विकत घेतात व कोणत्याही ग्राहकास क्षुल्लक किमतीत विकतात, असे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे मोबाइलची चोरी करत असल्याचे दोघांनी कबूल केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलिस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, सहायक पोलिस फौजदार सुनील कदम, अनिल दांगट, पोलिस हवालदार छाया चव्हाण, नीलेश बिडकर, पोलिस अंमलदार सिद्धार्थ वाघमारे, नेमाजी केंद्रे, मारटकर, आरपीएफचे निरीक्षक यादव, पोलिस उपनिरीक्षक लाड, युवराज गायकवाड, विशाल माने, रसूल सय्यद यांनी केली.