पुणे : शहरात वेगवेगळ्या घटनेत वादातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी बाणेर आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पाषाणमधील सुतारवाडी परिसरातून वैमनस्यातून एका तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवारी (दि. २) घडली. या प्रकरणी चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत ज्ञानेश्वर रखमाजी कडेकर (१९, रा. खेडेकर चाळ, सुतारवाडी, पाषाण) याने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात कडेकर याचा मित्र सचिन कटप्पा माने जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेकर आणि माने पाषाणमधील शिवसेना चौकात मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी टोळक्याने कडेकर आणि माने यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना दगड फेकून मारले. माने तेथून पळाला. आरोपींनी पाठलाग करून माने याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिसांनी पसार झालेल्या एका आरोपीला ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस निरीक्षक सानप पुढील तपास करत आहेत.
दुचाकीचा हाॅर्न वाजवल्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना काेंढवा भागात घडली. महादेव बबरूवान टोम्पे (४१, रा. भराडे वस्ती, येवलेवाडी, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत टोम्पे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टोम्पे येवलेवाडी भागातून निघाले होते. त्यावेळी आरोपीने हाॅर्न का वाजवला, अशी विचारणा करून टोम्पे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गावडे करत आहेत.