पुणे : बिहारमधून रांजणगाव परिसरात मजुरी करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने शेजाऱ्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला पंजाबमधून अटक करुन त्यांच्या ताब्यातून तीन वर्षांच्या बालकाची सुखरूप सुटका केली. अपत्य होत नसल्याने बालकाचे अपहरण केल्याची कबुली आरोपी दाम्पत्याने दिली.
या प्रकरणी पूजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव (वय ३७) आणि अर्जुनकुमार वकीलकुमार यादव (३६, दोघे मूळ रा. लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार) यांना अटक केली आहे. आयुष महेंद्र पडघान (वय ३) असे सुखरूप सुटका केलेल्या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर स्थायिक झाले आहेत. नगर रस्त्यावरील कारेगाव परिसरात काजल महेंद्र पडघान (मूळ रा. जुमडा, जि. विशीम), त्यांचा भाऊ प्रमोद पाटील आणि मुलगा आयुष हे राहायला आहेत. आरोपी यादव दाम्पत्य शेजारी आहे. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून यादव दाम्पत्य तेथे वास्तव्य करत होते. काजल पडघान आणि त्यांचा भाऊ प्रमोद पाटील हे खासगी कंपनीत कामाला आहेत. कामावर जाताना ते शेजारी राहणाऱ्या यादव दाम्पत्याकडे आयुषला ठेवून जात होते.
१२ सप्टेंबर रोजी काजलने मुलगा आयुषला यादव दाम्पत्याकडे ठेवले. कामावरून सायंकाळी त्या परत आल्या. तेव्हा यादव दाम्पत्याचे घर बंद होते. काजल आणि त्यांचा भाऊ प्रमोद यांनी यादव दाम्पत्याचा शोध घेतला. यादव दाम्पत्याचे मोबाइल बंद होते. यादव यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी १५ सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला. तांत्रिक तपासात यादव दाम्पत्य पंजाबमधील लुधियाना परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक लुधियानाला रवाना झाले. पोलिस पथकाने बुधवारी (दि. १७) यादव दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार रामल, उपनिरीक्षक अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय सरजिने, संकेत जाधव यांनी ही कामगिरी केली. तपासासाठी लुधियाना पोलिस दलातील निरीक्षक सुरेशकुमार रामल आणि गुरमितसिंग यांनी सहाय केले.