पुणे : मेलद्वारे युट्यूब चॅनेल हॅक करून व्हिडीओची चोरी करून सायबर चोरट्यांनी ‘गेम हॅक’ नावाचे व्हिडीओ अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहुरंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांच्याबाबत ही घटना घडली. यासंदर्भात त्यांनी सायबर क्राइमला ऑनलाइन व चतुःश्रृंगी पोलिस ठाणे येथे तक्रार केली आहे.
संसदेने ऑनलाइन गेमिंग प्रोमोशन आणि रेग्युलेशन विधेयक २०२५ नुकतेच मंजूर केले आहे. या विधेयकामुळे झटपट करोडो रुपये जिंका, असे सांगून दिशाभूल करणारे गेम, तसेच क्रिकेटमध्ये टीम लावून रोज पैसे जिंका सांगणाऱ्या सर्वच प्लॅटफॉर्मवर बंदी येणार आहे. त्यामुळे सायबर चोरटे या गेम्स लोकांपर्यंत पोहोचविण्याचे विविध फंडे शोधू लागले आहेत. बहुरंग, पुणे ही नाट्य-चित्रपट, साहित्य आणि सामाजिक कार्यात काम करणारी संस्था असून, ‘बहुरंग पुणे’ युट्यूब चॅनल गेली दहा वर्षे कार्यान्वित आहे.
डॉ. कुंडलिक केदारी म्हणाले, सायबर चोरट्यांनी माझा मेल आयडी हॅक केला आणि त्यावर ‘गेम हॅक’ करणारे व्हिडीओ अपलोड करणे सुरू केले. दोन-तीन दिवसांत दहा व्हिडीओ अपलोड झाले. सायबर चोरट्यांना आयतेच पाच हजार सबस्क्राइबर मिळाल्यावर त्यांनी बहुरंग, पुणे चॅनल वरील सर्व व्हिडीओ डिलिट केले. त्यामुळे लाखो रुपये किमतीचे व्हिडीओ चोरीला गेले. हा ‘डाटा’ संस्थेकडे उपलब्ध नसल्यामुळे संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे.
सायबर चोरट्यांनी जर मेल हॅक केला, तर त्यांना युट्यूब चॅनलचा ॲक्सेस सहजपणे मिळू शकतो. जर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नसेल, तर फॉरगेट पासवर्ड करून मेल हॅक होतो किंवा लिंक पाठवून पण ओटीपी मागवता येतो. सबस्क्राइबर लाखात असतील, तर युट्यूब इंडिया त्यांना संरक्षण देते. छोट्या युट्यूबर्सचे चॅनल हॅक झाले, तर त्यांना स्वत:च्याच पातळीवर लढावे लागते. मेलला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असायला हवे. कुणी हॅक करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी ओटीपी येईल. आपली जन्मतारीख, आईचे नाव सगळे टाकायला हवे, जेव्हा रिसेट करायची वेळ येईल, तेव्हा हा प्रश्न विचारला जाईल. हॅकर्स जास्तीत जास्त ओटीपी मिळवू शकतो, पण या गोष्टी त्याला माहिती नसतील. - ओंकार गंधे, सायबर अभ्यासक