पुणे : गृह उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याच्या आमिषाने दाेन लाख ७० हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी बारामतीतील एका दाम्पत्याविरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुनील नारायण शिराळकर आणि सविता सुनील शिराळकर (दोघे रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती, जि. पुणे) असे आरोपी पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत रागिणी सुधीर धोंगडे (४३, रा. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योग वर्धिनी या संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभागृहात बैठक घेतली होती. गृहिणींनी उद्योगासाठी मदत, तसेच कच्चा मालाचा पुरवठा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते.
राखी, जपमाळ तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून शिराळकर दाम्पत्याने धोंगडे यांच्याकडून दोन लाख ७० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर शिराळकर दाम्पत्याने त्यांना गृहउद्योग सुरू करण्यासाठी कच्चा माल पुरवला नाही, असे धोंगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिरसाट पुढील तपास करत आहेत.