पुणे : कोंढव्यात एका टोळक्याने एका रिक्षा चालक तरुणावर बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद सोहेल उर्फ पंजाबी आजम खान (वय २५, रा.नवाजीश पार्क, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद खान हा रिक्षा चालक असून, तो साळुंखे विहार रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीजवळून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून पट्ट्याने मारहाण केली. एका आरोपीने त्याला कोयत्याने मारण्याची धमकीही दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, उरलेल्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक महाडिक पुढील तपास करत आहेत.
बिबवेवाडीत बेकरी कामगाराला मारहाण
बिबवेवाडी भागात दोन व्यक्तींनी एका बेकरी कामगाराला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी कुणाल वैराट आणि मंगेश माने (दोघेही बिबवेवाडी गावठाण भागाचे रहिवासी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्श फैजुल अन्सारी (वय १७) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी हा बिबवेवाडी गावठाण परिसरातील एका बेकरीत कामाला आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून त्याचा आरोपींशी वाद झाला. त्यानंतर, आरोपींनी अन्सारीला मारहाण केली आणि दुकानातील वजन काटा फेकून मारला. त्यावेळी बेकरीतील इतर कामगारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक बाळू चोपडे पुढील तपास करत आहेत.