पुणे : तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच येरवडा भागात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रूपाली (दोघेही रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीची विवाहापूर्वी आरोपी पंकज पाटील याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. यानंतर पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीच्या पतीच्या मोबाइलवर पाटीलने तरुणीबरोबर काढलेली छायाचित्रे पाठवली. या घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. पाटील आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
तरुणीच्या आईने नुकतीच याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पाटील आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक मिथुन सावंत अधिक तपास करत आहेत.