पुणे : माहेरकडून गाडी घेऊन न आल्याने पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद येथे मंगळवारी घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे. अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (२१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर शिवाजी रमेशचंद्र मौर्या (२६, रा. बारावा मैल, लोणीकंद) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
याबाबत विवाहितेचा भाऊ विजयबहादूर पतीराम मौर्या (वय २७, रा. सेमरा, सोनपूर, ता. जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लहान बहीण अंजनीकुमारी मौर्या हिचा विवाह शिवाजी मौर्या याच्याशी २८ एप्रिल रोजी झाला. लग्नामध्ये समाजातील रीतीरिवाजाप्रमाणे मान पान, फर्निचर, संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. लग्नानंतर काही दिवस गावाला राहून ४ महिन्यांनंतर ते लोणीकंद येथील बारावा मैल येथे राहू लागले.
पुण्यात राहायला आल्यावर शिवाजी याने अंजनीकुमारीला तुझ्या बापाने लग्नात मोटारसायकल दिली नाही, या कारणावरून वारंवार शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पतीकडून होणारा त्रास तिने फोन करून आपल्या वडिलांनी सांगितला. वडिलांनी जावयाला आर्थिक स्थिती हालाखीची आहे, आम्हाला समजून घ्या, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही तो त्रास देतच होता. शेवटी या त्रासाला कंटाळून अंजनीकुमारीने १६ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेदहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.