'तुम्ही महार मांगाच्या मुली आहात, किती मुलांसोबत झोपला आहात की लेस्बियन आहात का?', असे प्रश्न विचारत. मुलींचे मोबाईल घेऊन त्यांच्या चॅट्स वाचत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तरुणींनी रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन केलं. रात्री आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली. तरुणींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर रोहित पवार तरुणींसह पोलीस आयुक्तालयात गेले आणि कारवाईची मागणी केली. रोहित पवारांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुण्यात नोकरी करत असलेल्या आणि कोथरूडमध्ये राहत असलेल्या तीन तरुणींच्या घरी पोलीस गेले. त्यांचे कपडे तपासले. त्यांच्या मोबाईलमधील चॅट्स वाचल्या. त्यांना जातीवरून सुनावले. इतकंचनाही तर किती मुलांसोबत झोपल्या आहात, तुम्ही लेस्बियन आहात का? असे प्रश्न विचारून पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तरुणींनी पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या दिला.
दबाव कुणी आणला, निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? रोहित पवारांचा सवाल
आमदार रोहित पवार यांनी या मुलींची भेट घेतली. तरुणींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रोहित पवार तरुणींना पोलीस आयुक्तालयात घेऊन गेले. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची त्यांनी भेट घेतली. या प्रकरणी कारवाई केली नाही, तर आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा त्यांनी दिला.
"छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत", असा संताप रोहित पवारांनी व्यक्त केला.
झिरो पोलीस महिलेवरही कठोर कारवाई झाली पाहिजे
"या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील", असे रोहित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.