नीरा : पुरंदर तालुक्यातील वीर येथील समृद्धी बिअर बार हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून सहा जणांच्या टोळीने हॉटेल मालकाला जमाव जमवून मारहाण केल्याची घटना २४ जुलै रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल मालक सौरभ सुरेश वाघ (वय ३२, रा. वीर, ता. पुरंदर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समृद्धी बिअर बारच्या चायनीज किचनमध्ये बिअरच्या बिलावरून वाद झाला. आरोपी दिलीप विलास धुमाळ आणि अमोल आप्पासो धुमाळ यांनी इतर नातेवाईकांना बोलावून हॉटेल मालकाला दमदाटी करत, लाथा-बुक्क्यांनी, काठी आणि विटेने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात सौरभ वाघ यांना गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी दिलीप विलास धुमाळ, अमोल आप्पासो धुमाळ, कमलेश शिवाजी धुमाळ, संदीप दादासो धुमाळ, सत्यजित प्रतापसिंग धुमाळ आणि शंभुराज महादेव धुमाळ (सर्व रा. वीर, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. यू. थोरवे तपास करीत आहेत.