पुणे : हैदराबादला जाण्यासाठी खासगी कार देण्याच्या बहाण्याने सायबर चाेरट्यांनी कोंढव्यातील एका डाॅक्टरची ८० हजार रुपयांची फसवणूक केली. यातून मिळालेल्या पैशांमधून चाेरट्यांनी महागडा मोबाइल संच खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याबाबत एका डाॅक्टरने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तक्रारदार डाॅक्टरला हैदराबादला जायचे होते. त्यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून हैदराबादला जाण्यासाठी भाडेतत्त्वावर कार घेतली. संबधित संकेतस्थळावर नोंदणी करताना डाॅक्टरने वैयक्तिक माहिती दिली होती. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ८० हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग केले.
या पैशांचा वापर करून चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महागडा मोबाइल संच खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत.