वारजे : वारजे परिसरातील स्मशानभूमीजवळ मुठा नदीपात्रात एका अनोळखी पुरुष जातीचे मृत भ्रूण पाण्यात वाहत आल्याचे आढळून आले. अग्निशमन विभागाने लगेच पाण्यात उतरून त्यास ताब्यात घेतले व पुढील कारवाईस पोलिसांच्या ताब्यात दिले.
सध्या गणपतीचे दिवस असल्याने व या ठिकाणी विसर्जन हौद उभारण्यात आल्याने पालिका व अग्निशमन विभागाकडून स्मशानभूमी जवळ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास नियमित टेहळणीदरम्यान नदीपात्रावर तैनात जीवरक्षकांना हे भ्रूण पाण्यात वाहत येताना दिसले. तातडीने त्यांनी वारजे पोलिस ठाणे तसेच अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली.
सदर माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद मरळ व जवान घटनास्थळी दाखल झाले. साधारण अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी त्यास पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांचे पथक घटनास्थळी येईपर्यंत अग्निशमन दलाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
जीवरक्षक तुषार मुळेकर, प्रथमेश पवार यांच्यसह अधिकारी प्रमोद मरळ, फायरमन बाबूराव शितकल यांनी ही कारवाई केली. नदीकाठावर वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने या भागात कायमस्वरूपी कॅमेरे बसवण्याची नागरिकांची मागणी आहे. उत्तरीय तपासणीसाठी हे भ्रूण ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी दिली.