पुणे : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून एक महिला तिच्या ८ महिन्यांच्या बाळाला घेऊन चित्रकूट येथून पुणे रेल्वे स्टेशनवर येते. स्वतःचे आयुष्य आनंदाने जगता यावे यासाठी शहरातील एका ओळखीच्या इसमासोबत नवीन संसार थाटण्याचा तिचा विचार असतो.रेल्वे स्टेशनवर ती येताच तिचा होणारा नवरा तिला घेण्यासाठी आलेला असतो.दरम्यान, रेल्वे स्टेशनवर दोघे गप्पा मारत असताना त्यांची ओळख अन्य एका जोडप्यासोबत होते. चौघेही गरीब परिस्थितीतील, मोलमजुरी करणारेच असल्याने त्यांच्यातील गप्पा चांगल्याच रंगतात. जेवणाची वेळदेखील झालेली असल्याने ती होणाऱ्या नवऱ्याला जेवण पार्सल घेऊन येण्यास सांगते.
जेवण झाल्यावर ती आणि होणारा नवरा हात धुण्यासाठी जातात, त्यावेळी ते ८ महिन्यांचे बाळ काही वेळापूर्वीच ओळख झालेल्या जोडप्याकडे सांभाळण्यासाठी देऊन जातात. हात धुऊन आल्यावर मात्र, बाळ आणि ते जोडपे गायब असल्याचे तिच्या निदर्शनास येते. रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारीच ही घटना घडते.
यानंतर काही वेळाने संबंधित महिला लोहमार्ग पोलिस ठाण्यात जात बाळाचे अपहरण केल्याची तक्रार देते. येथून पुढे सुरू होतो २७दिवसांचा प्रवास. लोहमार्ग पोलिसांकडे महिलेची तक्रार येताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर हे सबंध ठाण्याला घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे स्टेशन परिसरातील ७१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे अपहरणकर्त्याचा शोध घेण्याच्या सूचना देतात. पोलिस ठाण्याच्या बाजूलाच ही घटना घडल्याने त्यांची भावना नाक कापल्यासारखी झाली. २ दिवसांनंतर एका कॅमेऱ्यात महिलेने सांगितलेल्या वर्णनाचे दोघे दिसतात.
आरोपींपैकी पुरुषाने मिलिटरी पद्धतीची ट्रॅक पँट, काळे जाकीट, त्यावर वाघाचे चिन्ह, महिलेच्या पायात स्लीपर आणि अंगावर जाकीट असे त्यांचे वर्णन होते. दोघेही बाळाला घेऊन रेल्वे स्टेशनसमोरील एसटी स्टँडच्या समोरून रिक्षाने जाताना पोलिसांना दिसून येतात. पोलिस सीसीटीव्ही फुटेजवरून रिक्षाचा फोटो काढून तो विविध रिक्षा संघटनांना पाठवतात. त्यात रिक्षाचा नंबर स्पष्ट नसल्याने पोलिसांचे त्या प्रकारच्या जवळपास ६० ते ७० रिक्षा तपासण्यात ८ दिवस जातात. ९ व्या दिवशी संबंधित रिक्षा चालक स्वतः पोलिसांकडे हजर होतो आणि त्या जोडप्याला स्वारगेट बस स्टँड येथे सोडल्याचे सांगतो. अपहरणकर्त्यांनी साताऱ्याकडे जाण्यासाठी बसची विचारणा केल्याचे तो पोलिसांना सांगतो त्यानुसार पोलिस स्वारगेट बसस्थानकावर जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासतात. परंतु तेही बंद अवस्थेत होते.२७ लाख मोबाइल नंबर धुंडाळले...पोलिस याप्रकरणी या परिसरातील २७ लाख मोबाइल नंबरचा डंम्प डेटा आणि सीडीआर डिटेल्स मिळवतात. त्यातून ७ हजार नंबर शॉर्टलिस्ट केले जातात. पुढे पोलिसांना त्या पुरुष आरोपीने घातलेले जाकीट चाकण येथील एका सिक्युरिटी कंपनीचे असल्याचे समजते. शिरवळ येथून पोलिस चाकणला येतात. सिक्युरिटी कंपनीतील ६ हजार लोकांचे नंबर घेऊन पुन्हा त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले जाते.'ते' दोघे शिरवळला नाही, तर गेले पाषाणलाहा सगळा खटाटोप करूनही हाती काहीच लागत नसल्याने पोलिस पुन्हा स्वारगेट बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासतात. एका दुकानदाराच्या कॅमेऱ्यात ते दोघे दुसऱ्या रिक्षाने पाषाणला गेल्याचे पोलिसांना समजते. पोलिस त्यांचा मोर्चा पाषाण आणि तेथून पुढे सुसगाव येथे वळवतात.अखेर पोलिसांनी बाळ केले आईच्या हवाली गरिबीमुळे बाळाच्या आईकडे कोणतेही कागदपत्र नसल्याने, पोलिस पथक पुन्हा चित्रकूट येथे जाऊन ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला डॉक्टरांकडून कागदपत्रे आणून, ते तेथील तपासून बाळ सुखरूप त्याच्या आईच्या हवाली करतात. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, आरोपी महिलेला न्यायालयाने जामीन दिला आहे.लोणावळ्याहून थेट अहमदाबाद...पोलिसांना दोन्ही आरोपी लोणावळ्याहून अहमदाबाद रेल्वेने जाताना दिसतात. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर उतरलेलेदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसतात. तेथे गेल्यावर पोलिसांनी शॉर्टलिस्ट केलेल्या मोबाइल नंबरद्वारे आरोपी हे अहमदाबाद येथे झोपडीत राहत असल्याचे स्पष्ट झाले व सापडले.पूर्वीही केला होता बाळ चोरण्याचा प्रयत्न..दोघांना ताब्यात घेऊन बाळासह पोलिस पुण्यात आल्यानंतर आरोपींकडे केलेल्या चौकशीत अपहरणकर्त्या महिलेला कधीच मूलबाळ होऊ शकत नसल्याचे माहिती असल्याने त्यांनी यापूर्वीदेखील ससून रुग्णालयातून बाळ चोरण्याचा २ ते ३ वेळा प्रयत्न केला होता, मात्र तेथील सुरक्षा रक्षकांमुळे त्यांची हिंमत झाली नाही.
अगदी पोलिस ठाण्याच्या बाजूलाच ही अपहरणाची घटना घडल्याने मी प्रचंड अस्वस्थ झालो होतो. यात अपहरणाशिवाय अनेक मुद्दे महत्त्वाचे होते. माझ्या संपूर्ण पोलिस ठाण्याच्या टीमने अहोरात्र काम करून बाळाचा शोध घेतला. - प्रमोद खोपीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक