- हिरा सरवदेपुणे - शहरातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून महापालिकेचे वास्तववादी व लोकाभिमुख अंदाजपत्रकाला तयार केले आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी क्षेत्रीय स्थरावर समित्यांची निमिर्ती करण्यात येणार असून यासाठी अंदातपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
पुणे महापालिकेचे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे १२ हजार ६१८.०९ कोटीचे अंदाजपत्रक डॉ. भोसले यांनी मंगळवारी सादर केले. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., महापालिकेचे अपर आयुक्त महेश पाटील, वित्त व लेख अधिकारी उल्का काळसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, नगरसचिव योगित भोसले यांसह महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
भोसले म्हणाले, महापालिकेच्या कर्वचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतींची दुरस्था झाल्याने या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या विचारात घेवून स्वच्छतेची जबाबदारी केवळ घनकचरा विभागावर न टाकता या विभागास पथ, विद्युत, मलनिस्सारण, शाळा आदींचा समावेश यात करण्यात येणार आहे. साथरोगांसाठी स्वतंत्र विभागासह सुसज्य प्रयोगशाळा, शहरातील स्मशानभूमीचा विकास करण्यासोबतच महापालिकेच्या मालकीच्या जागांचा योग्य विनियोग करून उत्पन्न वाढवण्याचा मानस आहे.
समाविष्ट गावांमधील विविध विकास कामांसाठी ६२४ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेच्या अंदाजपत्रकात पहिल्यांदाच रस्त्यांच्या भूसंपादनासाठी २०० कोटीपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरातील मिसींग लिंक पूर्ण होण्यास मदत होईल. शहरातील मंडईंचे नुतनीकरण करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, स्पर्धा परीक्षांसाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे, महिलांच्या बचत गटांसाठी शहरात विविध ठिकाणी सुपर स्टोअर उभारण्यासह विविध ४० प्रकारचे धोरणात्मक निर्णय अंदाजपत्रकाच्या माध्यमातून घेण्यात आल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.