Pune Corona virus : लॉकडाऊन संपला तरी राज्य सरकारच्या निर्बंधांचे पालन बंधनकारक : नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:02 PM2020-07-23T19:02:14+5:302020-07-23T19:24:25+5:30
लॉकडाऊननंतरची नवीन नियमावली आयुक्त जाहीर करणार
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत आज ( दि.२३) मध्यरात्री संपत आहे.त्यामुळे उद्यापासून प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसार सर्व बाजारपेठा,सर्व प्रकारचे व्यवहार पूर्ववत सुरु होणार आहे. मात्र, नागरिकांच्या शनिवार व रविवारी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊननंतरची नवीन नियमावली आयुक्त जाहीर करणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत आज मध्यरात्री संपत असल्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुढील नियोजनाबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राम म्हणाले, लॉक डाऊन संपत असला तरी सर्व नागरिकांना नवीन नियमावली जाहीर होईपर्यंत राज्य सरकारच्या निर्बंधाचे अत्यंत काटेकोर पणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. दुकानांसाठी पूर्वीचे P1, P2 चे नियम कायम राहणार आहे. त्यासाठी सध्यातरी नवीन वेगळा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. बाजारपेठ आणि लग्न समारंभातही गर्दी होते, सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर नेमके कोणते प्रतिबंध असणार आहे यावर पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन नियमावलीची घोषणा आयुक्त करतील.
........
उद्यापासून हे सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा
- सायकलिंग, धावणे, चालणे, अन्य व्यायाम
- वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण
- सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी
- केश कर्तनालय, स्पा, पार्लर यांना नियम पाळून मुभा
- टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्यक प्रवासासाठी परवानगी
- वाइन शॉपसह सर्व प्रकारची दुकाने पी 1- पी 2 या पद्धतीने सुरु राहणार