पुणे : गणपती विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल यांसह विविध जल स्त्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे छायाचित्रण, तसेच त्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची तसेच सार्वजनिक शांततेस बाधा येण्याची शक्यता असल्याने पुणे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा मनाई आदेश १५ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.
हे आहेत विसर्जन घाट
संगम घाट, नेने / आपटे घाट, वृद्धेश्वर घाट / सिद्धेश्वर घाट, ओंकारेश्वर, अष्टभूजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे, बापू घाट (नारायण पेठ), खंडोजी बाब चौक, विठ्ठल मंदिर (अलका चौक), गरवारे कॉलेजची मागील बाजू, ठोसर पागा घाट, दत्तवाडी घाट, राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर, औंधगाव घाट, चिमा उद्यान येरवडा, बंडगार्डन घाट, वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदी किनार, पांचाळेश्वर या घाटावर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.