Pune Airport : सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:56 IST2025-02-08T12:56:45+5:302025-02-08T12:56:53+5:30

सेवा गुणवत्ता निर्देशांकात ७४ स्थानांवरून ६७ व्या स्थानी झेप

Pune Airport passes in service quality index | Pune Airport : सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ पास

Pune Airport : सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ पास

-अंबादास गवंडी 

पुणे :
लोहगाव विमानतळावर विमान प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळ पास झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांतील विमानतळावरील सुविधेबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण व 'एसीआय-एएसक्यू' (एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिस क्वॉलिटी) यांनी अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळाचा दर्जा सुधारला असून, ७४ स्थानांवरुन ६७ व्या स्थानी झेप घेतली आहे.

पुणे विमानतळावर नव्या टर्मिनल सुरू झाल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. शिवाय प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जाही सुधारला आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे.

विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर आधारित भारतीय विमानतळ प्राधिकरण व 'एसीआय-एएसक्यू'कडून सर्वेक्षण केले जाते. यावेळी प्रवाशांची मते जाणून घेतली जाते. विमानतळावर मिळणाऱ्या एकूण ३१ सुविधांचे 'एसीआय-एएसक्यू'कडून सर्वेक्षण करून विविध निष्कर्षांच्या आधारे तपासणी केली जाते. जुलै ते सप्टेंबर २४च्या तिमाहीत पुणे विमानतळ सेवा गुणवत्तेत ७४ व्या स्थानी होते. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ च्या तिमाही सर्वेक्षणात पुणे विमानतळ ६७व्या स्थानी पोहोचले आहे. ही बाब प्रवाशांसाठी आनंदाची बाब आहे.

पुणे विमानतळाच्या एसीआय-एएसक्यू सर्वेक्षणात झालेली सुधारणा ही नक्कीच स्वागतार्ह आहे. प्रवाशांना उत्तम सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी विमानतळ प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांची ही पावतीच आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लक्ष घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे नवीन टर्मिनलमध्ये स्थलांतरित होणे, नवीन टर्मिनल पूर्ण क्षमतेने सुरू होण्याच्या कामास गती मिळणे, याला गती मिळाली. सेवा गुणवत्ता निर्देशांकात सात रँकने सुधारणा झाल्यामुळे उत्साहवर्धक बाब आहे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

सेवा गुणवत्ता निर्देशांकात हे आहेत निकष...

- स्वच्छतागृहाची स्थिती

- विमानतळावर प्रवास करताना गेटवर लागणारा वेळ

- रेस्टाॅरंट आणि शाॅपिंग माॅलमधील कर्मचाऱ्यांकडून मिळणारा वागणूक

- टर्मिनलमधील स्वच्छता

- चेक इन व सेक्युरिटी काऊंटरमध्ये प्रवाशांना मिळणारी सेवा

- कर्मचाऱ्यांकडून विमान प्रवाशांना मिळणारी वागणूक

- याशिवाय इतर २६ निकषांद्वारे गुणवत्ता तपासली जाते.

Web Title: Pune Airport passes in service quality index

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.