पुणे : पुण्याहून मंगळवारी मध्यरात्री दुबईसाठी (एसजी ५२) उड्डाण करणारे विमान अचानक रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विमान अचानक का रद्द केले, हे विमान कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही. स्पाईस जेटचे विमान मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनिटांनी दुबईसाठी उड्डाण करणार होते. त्यासाठी दोन तास अगोदर प्रवासी आले होते.
पण, प्रवाशांना विमान उड्डाणापूर्वी अचानक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. गेल्या काही दिवसांपासून दुबईच्या विमानाला उशीर होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी विमानाला तीन तास उशीर झाला होता. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले. मंगळवारी पुन्हा अचानक विमान रद्द केल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.