पुणे : कात्रज जुना बोगद्याच्या अलीकडे असलेल्या खोल दरीत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक ट्रक कोसळला. या अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळताच, दलाकडून कात्रज अग्निशमन वाहन व मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली.
घटनास्थळी पोहोचताच जवानांना एक ट्रक खोल दरीमध्ये सुमारे २०० फूट अंतरावर पडला असून, वाहनचालक जखमी असल्याचे आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जवानांनी दोरी, सेफ्टी बेल्ट याचा वापर करून तातडीने जखमी असलेल्या वाहनचालकाशी संवाद साधत त्याला धीर देत बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. संबंधित ट्रक हा साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येत होता. जखमी वाहनचालक हा लातूरचा असून त्याचे नाव विकास रसाळ (३२) आहे.या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर व तांडेल वसंत भिलारे, विजय गोसावी, वाहनचालक बंडू गोगावले, उबेद शेख फायरमन किरण पाटील, अक्षय देवकर, मयूर काटे, प्रशांत कुंभार, केतन भोईर, मंगेश खंडाळे, अक्षय शिंदे, किशोर टकले, अन्वर शेख यांनी सहभाग घेतला.