मसालेदार कथेचा नायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:49+5:302020-12-04T04:29:49+5:30
त्यामुळं आता भारतीय मसाल्यांना आशियातल्या चीनसह अनेक छोट्या-मोठ्या देशांची स्पर्धा चालू आहे. तरीही भारतीय मसाल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आजही कायम ...

मसालेदार कथेचा नायक
त्यामुळं आता भारतीय मसाल्यांना आशियातल्या चीनसह अनेक छोट्या-मोठ्या देशांची स्पर्धा चालू आहे. तरीही भारतीय मसाल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुद्धता आणि सत्यता या दोन कसोट्यांवर आजही जगभरातले नामांंकित ‘शेफ’ चीनपेक्षा भारतीय मसाल्यांना प्राधान्य देताना दिसतात. त्यामुळंच भारतीय मसाल्यांची निर्यात वीस हजार कोटी रुपयांच्या पार गेलेली आज दिसते. देशांतर्गत मसाला बाजारपेठ एक लाख कोटींच्या
घरात आहे. भारतीय मसाल्यांना लाभलेली ही पारंपरिक प्रतिष्ठा आणि दर्जा जपण्याचं, वाढवण्याचं काम ज्यांनी केलं त्यात धर्मपाल गुलाटी या अवलियाचं योगदान महत्त्वपूर्ण आहे.
सत्तेचाळीस साली देशाची फाळणी झाल्यानंतर भारतात आलेल्या अनेक उध्वस्त आणि कफल्लक कुटुंबांत गुलाटींचा समावेश होता. पाकिस्तानातल्या सियालकोटमध्ये असल्यापासूनच गुलाटी परिवार उद्योग-व्यवसाया होता. मसाले विक्रीची सुरुवात त्यांनी तिथंच केली होती. फाळणीनंतरचा गुलाटी कुटुंबियांचा पहिला मुक्काम अमृतसरच्या निर्वासितांच्या छावणीत होता आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली गाठली. दिल्लीत आल्यावर धर्मपाल यांनी पुन्हा मसाल्यांच्या व्यवसायात हात घातला. तिथून त्यांनी मागं पाहिलं नाही. वयाच्या ९७ व्या वर्षी गुलाटींचं निधन झालं. देश स्वतंत्र झाल्यापासून ७३ वर्षं गुलाटी त्यांच्या गृहउद्योगाचं नेतृत्त्व करत होते. पाचवीपर्यंत शिकलेल्या गुलाटी यांनी अल्प भांडवलावर चालवलेला घरचा छोटा व्यवसाय दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या ‘ब्रँड’मध्ये कसा रुपांतरीत केला याची यशोगाथा एव्हाना सर्वश्रृत आहे. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही स्वत:च्या कंपनीच्या जाहिरातीत ‘मॉडेल’ म्हणून झळकण्याचा त्यांचा गमतीदार स्वभाव, ‘एफएमसीजी’ क्षेत्रात वर्षाला सुमारे २१ कोटी रुपये इतका सर्वाधिक पगार घेणारे ‘सीईओ’ यासारख्या, आकडेदार मिशांची मिश्किल मुद्रा यासारख्या अनेक बाबींमुळं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत. त्यामुळं केवळ त्यांच्या कार्यालयातच नव्हे तर ते जिथं जातील तिथं त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढून घेण्यासाठी, त्यांची सही घेण्यासाठी झुंबड उडत असे. ही लोकप्रियता त्यांना स्वत:ला फार हवीहवीशी वाटत असे. कारण फाळणीनंतर भारतात आलेल्या धर्मपाल गुलाटींची जिद्दच मुळी होती की, ‘‘नाम कमाना है, बडा बनना है.’’
खरं तर रडत बसण्यासाठी आवश्यक कारणांची भलीमोठी यादी नियतीनं त्यांच्या नशिबी टाकली होतीच. भांडवल नाही, शिक्षण नाही, ओळखीपाळखी नाहीत, घरदार टाकून नव्या प्रांताशी करावी लागलेली सलगी, फाळणीनं दिलेल्या जखमा ही प्रतिकूलता सांगत बसले असते तर त्यांच्या निधनाची ‘बातमी’ही झाली नसती. यातलं काही घडणार नाही याची कटाक्षानं काळजी घेत धर्मपाल गुलाटी जिद्दीनं, चिकाटीनं चालत राहिले हे धर्मपाल गुलाटी यांचं वैशिष्ट्य. सात-सात दशकं एखादा व्यवसाय टिकतो आणि वाढत राहतो तेव्हा त्याच्या मुळाशी मूल्यांची, श्रद्धांची जोड असते. ही मूल्ये कौटुंबिक परंपरेने चालत आलेली असू शकतात, कधी विशिष्ट व्यक्तिमत्वांच्या प्रभावातून आलेली असतात. गुलाटींच्या मूल्यांचा पाया धार्मिक होता. व्यक्तिगत आयुष्यात ‘धर्मपाल’ हे नावाप्रमाणेच स्वत:च्या धार्मिक श्रद्धांचं काटेकोर पालन करत होते. दोन मुलं, सहा मुली, नातवंड-पतवंडं अशा मोठ्या परिवारात ‘महाभारत’ घडू न देता त्यांना एकत्र बांधून ठेवायचं आणि तीव्र ‘कॉर्पोरेट’ स्पर्धेत शंभर देशात व्यवसाय घेऊन जायचं ही व्यवस्थापन कौशल्याची मोठी कसरत आहे. गुलाटींच्या मसालेदार कथेतून या गुणांचं अनुकरणं करणं सहज जमण्यासारखं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे भारतीय मसाल्यांची वाढती मागणी लक्षात घेता या बाजारपेठेला आणखी कित्येक ‘गुलाटीं’ची गरज आहे.