मिळकतकरात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST2021-01-13T04:28:08+5:302021-01-13T04:28:08+5:30
पुणे : मिळकत करामध्ये सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाकरिता ११ टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडुन स्थायी समितीसमोर ...

मिळकतकरात ११ टक्के वाढीचा प्रस्ताव
पुणे : मिळकत करामध्ये सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाकरिता ११ टक्के करवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडुन स्थायी समितीसमोर मंगळवारी सादर करण्यात आला़ मात्र या प्रस्तावावर स्थायी समितीची खास सभा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे़
महापालिका प्रशासाने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सर्वसाधारण करामध्ये ५.५ टक्के, सफाई करामध्ये ३.५ टक्के आणि जलनि:सारण करामध्ये २ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सुचवला आहे. यामुळे मिळकत करामधून २ हजार १६४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेच्या हद्दीच २३ गावांचा समावेश होणार असल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात ११० कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. ही वाढ धरून महापालिकेला सन २०२१-२२ मध्ये २ हजार ४०० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळकतकरातून मिळेल असे अपेक्षित धरण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त यांनी स्थायी समितीला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे़
दरम्यान मिळकतकराची रक्कम १ एप्रिल ते ३१ मे २०२१ अखेर संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतधारकांना करामध्ये देण्यात येणारी ५ टक्के ते १० टक्के सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गांडूळखत, खत प्रकल्प, सोलर प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजनांसाठी देण्यात येणारी सवलत कायम राहणार असून, अन्य सवलतीही कायम ठेवण्यात आल्या आहेत़
-------------------
चौकट
२९ जानेवारीला प्रशासनाचे अंदाजपत्रक
महापालिकेचे २०२१-२२ या वर्षाचे अंदाजपत्रक २९ जानेवारीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार सादर करणार आहेत. तसे पत्र आयुक्तांनी स्थायी समितीला दिले आहे. मिळकतकरातील ११ टक्के वाढ करूनच आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार आहेत. त्यामुळे आयुक्तांचे अंदाजपत्रक व स्थायी समितीकडून सादर होणाऱ्या अंदाज पत्रकात आगामी महापालिकेची निवडणूक पाहता मिळकतकरामध्ये वाढ होणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे़
-----------------------------
बैठकीत दाखल मान्य विषयांचीच चलती
स्थायी समितीच्या बैठकीत आज दाखल मान्यतेसाठी सर्वाधिक प्रस्ताव आले. रस्ते, ड्रेनेज, डांबर प्लँट आदींसह कोरोना आपत्तीत सुरू केलेल्या विलनीकरण कक्षाकरीताची कोट्यावधीची विविध बिले असे नानाविध विषय दाखल मान्यतेसाठी आले़ त्यामुळे आजच्या सभेत दाखल मान्य विषयांचीच चलती होती़
-------------------------