भावजयांची दूध व्यवसायातून प्रगती
By Admin | Updated: February 23, 2017 02:09 IST2017-02-23T02:09:33+5:302017-02-23T02:09:33+5:30
वळे येथील महिला शेतकरी शारदा ज्ञानेश्वर शिवले, सुरेखा भानुदास शिवले, सुवर्णा अरुण शिवले या

भावजयांची दूध व्यवसायातून प्रगती
तुषार मोढवे / चासकमान
वळे येथील महिला शेतकरी शारदा ज्ञानेश्वर शिवले, सुरेखा भानुदास शिवले, सुवर्णा अरुण शिवले या भावजयांनी एकत्र कुटुंबाच्या माध्यमातून दूध व्यवसाय यशस्वी केला आहे.
उस व काही नगदी पिके सोडली तर इतर पिकांचे बाजारभाव सतत कोसळत आहे. या बाजारभावाची टांगती तलवार शेतकऱ्यांवर नेहमीच असते. वर्षातून एखादे पीक घेतले, तर मालाला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे किवळे येथील ज्ञानेश्वर शिवले परिवाराने शेतीला दूध व्यवसायाची जोड दिली आहे. जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची विविध पिके ते घेत आसतात, त्यांच्या शेतात मका, बाजरी, कडबा, गवत आदी पिके घेतली जातात. या पिकांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. घरच्याच शेतात चारा उपलब्ध होत असल्यामुळे चाऱ्यासाठी होणारा खर्च करावा लागत नाही. शिवले यांनी शेतात २८ फूट रुंद ५० फूट लांब आकाराचा गोठा तयार केला आहे.
गोठ्यातील सर्व जनावरांना शेतातील मका गवत कुटी मशिनद्वारे करून दिवसातून दोन वेळेस दिले जाते. तसेच पेड भुसा खुराक म्हणून दिला जातो. यामुळे दुधाला चांगला फॅट मिळतो. हे दूध मानवी शरीराला पोषक असते. खुराकामुळे गायींचे आरोग्य तंदुरुस्त राहाते. तसेच गायीची देखभाल व स्वच्छता राखण्यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य लाभते. गार्इंची वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले जातात. त्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते.
गायीपासून दर्जेदार शेणखत तयार होते. तयार झालेले शेणखत स्वत:च्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढविली जाते. शेणखतामुळे शेतीचा पोत सुधारतो उरलेले शेण विकले जाते.
स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वयंरोजगारातून स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवले यांनी चिकाटीने केलेला दूध व्यवसाय इतर युवकांनाही प्रेरणादायी ठरत आहे.