कचऱ्यामुळे तयार होणाऱ्या लिचेटवर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:10+5:302021-09-02T04:25:10+5:30
पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी कचरा डेपो परिसरात पावसाळ्यात कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लिचेटवर (दुर्गंधीयुक्त द्रवावर) प्रक्रिया करण्यासाठी, लिचेट ...

कचऱ्यामुळे तयार होणाऱ्या लिचेटवर प्रक्रिया
पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी कचरा डेपो परिसरात पावसाळ्यात कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या लिचेटवर (दुर्गंधीयुक्त द्रवावर) प्रक्रिया करण्यासाठी, लिचेट प्रक्रिया प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे़
सदर प्रकल्प भाडेतत्त्वावर घेऊन तो कार्यान्वित करण्यासाठी मे. अजंठा इनोव्हेटिव सोल्युशन्स या कंपनीला ९५ लाख ९९ हजार रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे़ कचऱ्यामुळे निर्माण होणारे लिचेट प्रक्रिया न होता नाल्यामध्ये वाहून जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही नोटीस दिल्याने महापालिका दरवर्षी टेंडर काढून लिचेट प्रक्रिया प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे़
पावसाळ्यात कचऱ्यामुळे तयार होणाऱ्या लिचेटची निश्चिती नसल्याने सदर प्रकल्पाची क्षमता ठरविता येत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे़ तसेच महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प विकत घेतल्यास त्याचा प्राथमिक खर्च, प्रकल्प चालविणे व त्याकरिताचा तांत्रिक कर्मचारी वर्ग तथा देखभाल दुरुस्ती याचा अभाव महापालिकेकडे असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. या अभावामुळेच दरवर्षी सदर ठिकाणी लिचेट प्रक्रिया प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात येत असल्याचे कारणही सोबत दिले आहे़
चौकट
सर्पोद्यान देखभालीचे काम भारतीय सर्पविज्ञान संस्थेस
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयामधील सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालय या विभागाच्या देखभालीचे काम भारतीय सर्प विज्ञान संस्थेस करारनामा वाढवून पुन्हा देण्यात आले आहे. ८ ऑगस्ट, २०२१ ते ७ ऑगस्ट २०२४ पर्यंतचे हे काम करण्यासाठीच्या ९३ कोटी ४८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तसेच करारनाम्यानुसार दरवर्षी या खर्चापोटी साडेसात टक्के वाढीव रक्कम देण्यासही अनुमती देण्यात आली आहे.
------------------