३०० टन कचऱ्याचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 04:04 IST2015-12-31T04:04:53+5:302015-12-31T04:04:53+5:30

हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नपदार्थांच्या कचऱ्यावर (फुडवेस्ट) प्रक्रिया करून त्यापासून बायो सीएनजी बनविण्याचा महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या देशातील

The problem of 300 tons of waste was solved | ३०० टन कचऱ्याचा प्रश्न सुटला

३०० टन कचऱ्याचा प्रश्न सुटला

पुणे : हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेल्या अन्नपदार्थांच्या कचऱ्यावर (फुडवेस्ट) प्रक्रिया करून त्यापासून बायो सीएनजी बनविण्याचा महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. साधारणत: ३००
टन अन्नपदार्थाच्या कचऱ्यावर
प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.
शहरातील कचरा उघड्यावर फेकून न देता दररोज तयार होणाऱ्या सर्व कचऱ्यावर डिसेंबर २०१६ पर्यंत प्रक्रिया करण्याचे लक्ष्य महापालिकेच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. त्या दिशेने
फुडवेस्टवर प्रक्रिया करणारा
प्रकल्प महापालिकेच्या वतीने उभारण्यात आला आहे. मार्च २०१६ मध्ये सुरू होणारा प्रकल्प मुदतीपूर्वीच ३ महिने तयार झाला असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.
शहरातून साधारणत: ९०० टनापर्यंत ओला कचरा तयार होतो. त्यापैकी २०० टन कचऱ्यावर अजिंक्य, दिशा या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. बायोगॅस प्रकल्पासाठी १०५ टन कचरा वापरला जातो. हॉटेलमधून तयार होणारा अन्नपदार्थांच्या ३०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तळेगाव येथे बायो सीएनजी बनविण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून तयार होणारा बायो सीएनजी गॅस ४५ रुपये दराने उपलब्ध करून दिला जाणार आहे, तर ठेकेदाराला प्रत्येक टनामागे ३६० रुपये महापालिकेच्या वतीने दिले जाणार आहेत.
उरुळी येथे मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ५०० टनाचा प्रकल्प उभारला जात आहे, डिसेंबर २०१६ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. तिथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाणार आहे, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. शहरातील १०० टक्के कचरा वर्गीकरण करून मिळावा, यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्रही काही कचरा हा एकत्रित स्वरूपात आल्यास त्यावरही प्रक्रिया करून वीजनिर्मिती करता येईल, असा मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी येथे ५०० टनाच्या प्रकल्पाची उभारणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत प्राणी जाळण्यासाठी मुंढवा येथे उभारण्यात आलेला कारकस प्रकल्प नदीपात्राच्या रेडलाइनमध्ये येत असल्याचे स्पष्ट झाल्याने तो तेथून दुसरीकडे हलविला जाणार आहे. पिंपरी-सांडस येथील जागा कचरा प्रकल्पास मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जागा महापालिकेच्या ताब्यात मिळेल, असे कुमार यांनी स्पष्ट केले.

राडारोड्यापासून तयार होणार बिल्डिंग मटेरियल
शहरामध्ये तयार होणारा राडारोड्याचा कचरा कुठे टाकायचा, याबाबत मोठा प्रश्न उभा राहिला होता. यावर चांगला तोडगा काढण्यात महापालिकेला यश आले आहे. राडारोड्याच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बिल्डिंग मटेरियल तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जानेवारी महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.

Web Title: The problem of 300 tons of waste was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.