खासगी रुग्णालयांच्या खाटा पुन्हा ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:40+5:302021-02-20T04:31:40+5:30
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे पालिका यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी ...

खासगी रुग्णालयांच्या खाटा पुन्हा ताब्यात घेणार
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे पालिका यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयाच्या खाटा पुन्हा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त स्तरावरून रुग्णालयांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने ही कार्यवाही केली जाणार आहे.
दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. दररोज होणाऱ्या तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) १० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरनंतर रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनालाही दिलासा मिळाला होता. सर्व व्यवहार बहुतांश प्रमाणात सुरळीत होऊ लागले होते. परंतु, अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासकीय स्तरावरही खबरदारी घेतली जाऊ लागली आहे.
आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांना खाटा उपलब्ध होत नव्हत्या. खासगी रुग्णालयांकडून अडवणूक केली जात होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या खाटा ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. यासोबतच जम्बो आणि बाणेरमध्ये कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले होते. पालिकेच्या कोविड सेंटरमध्येही उपचार देण्यात येत होते. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर पालिकेचे बहुतांश कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. यातील बाणेरचे कोविड सेंटर, डॉ. नायडू रुग्णालय, धायरीचा लायगुडे दवाखाना आणि बोपोडीच्या खेडेकर दवाखान्यात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार देण्यात येत आहेत.
परंतु, रुग्ण वाढू लागल्याने भविष्यात पुन्हा खाटांची कमतरता भासू नये तसेच रुग्णांना त्रास होऊ नये याकरिता नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेचे बंद असलेले कोविड सेंटर सुरु करण्यात येऊ शकतात. यासोबतच खासगी रुग्णालयांच्या खाटाही ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. आवश्यक ता भासल्यास पुन्हा या खाटा ताब्यात घेण्याच्या अटीवरच परत देण्यात आलेल्या होत्या. आयुक्त कार्यालय स्तरावरुन याबाबतचा पत्रव्यवहार सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु, काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
====
रुग्णालयातील खाटा क्षमता
बाणेर कोविड सेंटर ३५०
डॉ. नायडू रुग्णालय १२०
लायगुडे दवाखाना ५०
खेडेकर दवाखाना ५०