खासगी क्लासेसची ‘चांदी’
By Admin | Updated: September 1, 2015 04:15 IST2015-09-01T04:15:21+5:302015-09-01T04:15:21+5:30
इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा आणि केवळ सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा शासनाने

खासगी क्लासेसची ‘चांदी’
पुणे : इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एकच सीईटी घेण्याचा आणि केवळ सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय खासगी क्लासचालकांच्या पथ्यावर पडला आहे. परिणामी, सीईटी क्लासचालकांच्या वार्षिक उलाढालीत चांगलीच वाढ होणार आहे. तर, जेईई क्लासचालकांकडे येणाऱ्या विद्यार्थी संख्येत निम्म्याने घाट झालेली दिसून येईल.
पुणे शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांचे आणि खासगी क्लास चालकांचा करार झालेला आहे. त्यामुळे विज्ञान शाखेस प्रवेश घेणारे बहुतेक सर्वच विद्यार्थी खासगी क्लासमध्ये शिकवणी घेतात. गेल्या दोन वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमास जेईई परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जात होते. मात्र, येत्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून एमएचटी-सीईटीनुसार प्रवेश दिले जाणार असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे.
सध्या नामांकित क्लासकडून अकरावी, बारावी आणि सीईटी परीक्षेच्या शिकवणीसाठी ८० हजार रुपये आकारले जातात. तर, बारावी आणि सीईटीच्या मार्गदर्शानासाठी ३० ते ५० हजार रुपये शुल्क घेतले जाते. परंतु,केवळ सीईटीच्या गुणांवरच सर्व अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार आहेत. परिणामी, सीईटी क्लास चालकांच्या उलाढालीत चांगलीच वाढ होणार आहे.
विविध प्रवेशपूर्व परीक्षांचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, की पुणे शहरात सध्या ४०० ते ५०० अधिकृत खासगी क्लासचालक आहेत. त्यातील काही क्लासचे शुल्क एक ते दीड लाखांपर्यंत आहे. तर, बहुतेक क्लासचे शुल्क ५० ते ८० हजार रुपये आहे.
याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी अनधिकृतपणे गल्ली-बोळात क्लास सुरू केले आहेत. या क्लाससाठी विद्यार्थ्यांना २० ते ३० हजार रुपये शुल्क भरावे लागते. तर, अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३२ हजार आहे.
खासगी क्लासचालकांनी या ३२ हजार विद्यार्थ्यांकडून सरासरी ५० हजार शुल्क आकारले, तरी त्यांंची आर्थिक उलाढाल तब्बल १६० कोटींवर जाते. एकाच सीईटीच्या निर्णयामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यात आयआयटी आणि एनआयटीमधील प्रवेशाचे मार्गदर्शन करणाऱ्या क्लासचालकांची
संख्या १० ते १५ आहे. मागील वर्षी
या क्लासमध्ये सुमारे २५०० ते ३००० विद्यार्थी शिकवणी घेत होते. यंदा ही संख्या एक ते दीड हजारावर येण्याची शक्यता आहे.
परिणामी, सीईटी क्लास चालकांचा फायदा, तर जेईई क्लास चालकांचा तोटा होणार आहे.