राहुल गायकवाडपुणे : काहीजण रागाच्या भरात गुन्हा करतात अाणि अापल्या एका चुकीची शिक्षा त्यांना अायुष्यभर भाेगावी लागते. अनेकांचे संसार एका गुन्ह्यामुळे उघड्यावर पडतात. काहींना अापण केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप हाेत असताे परंतु शिक्षा भाेगण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसताे. अश्या कैद्यांच्या अायुष्यात येरवडा कारागृह प्रशासन एक अाशेचा किरण घेऊन अाले अाहे. कारागृहातर्फे चांगल्या वर्तणुकीच्या कैद्यांकडून कपडे इस्त्री करण्याचे काम करुन घेण्यात येत अाहे. या कामाचा माेबदलाही त्यांना देण्यात येताे. त्यामुळे स्वतःच्या अायुष्याची घडी विस्कटेलेले कैदी इतरांच्या कपड्यांना इस्त्री करुन देत अापलं अायुष्य नव्याने सुरु करत अाहेत.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. अनेक अाराेपी हे सराईत गुन्हेगार नसतात. रागाच्या भरात त्यांच्याकडून गुन्हा घडलेला असताे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अश्या कैद्यांना नाेकरी मिळणे अवघड असते. त्यातच समाजाकडून त्यांना अनेकदा स्विकारले जात नाही.घरातील कमावती व्यक्ती तुरुंगात गेल्याने अनेक कुटंबे उघड्यावर पडतात. त्याच्यासाठी उत्पन्नाचे दुसरे साधनही नसते. कैद्यांनाही तुरुंगात घरच्यांची काळजी सतावत असते. त्यांच्या मनात अनेक विचारांनी काहूर माजवले असतात. अशातच हे कैदी सर्व विसरुन कामात मग्न रहावेत तसेच त्यांच्या कुटुंबालाही त्यांना हातभार लावता यावा या उद्देशाने तुरुंग प्रशासनाकडून कैद्यांन मार्फत लाॅन्ड्री शाॅप चालविले जाते. या लाॅन्ड्रीमध्ये चांगल्या वर्तनाच्या कैद्यांना काम दिले जाते. त्यांना साधारण 61 रुपये इतका राेजही दिला जाताे.
या उपक्रमाबाबत बाेलताना वरीष्ठ तुरुंग अधिकारी नितीन क्षिरसागर म्हणाले, इतर ठिकाणांपेक्षा कमी दराने कपडे याठिकाणी इस्त्री करुन दिले जातात. या माध्यामातून कैद्यांना एक राेजगार निर्माण झाला अाहे. ज्या कैद्यांचे वर्तन चांगले अाहे त्यांना या ठिकाणी कामासाठी ठेवले जाते. कैदी या ठिकाणी काम करुन अापल्या घरच्यांना पैसे पाठवू शकतात. त्याचबराेबर अनेकदा येथून बाहेर पडल्यानंतर त्यांना कुठे नाेकरी मिळत नाही, त्यामुळे या कामाचा उपयाेग त्यांना बाहेर पडल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी हाेऊ शकताे. कैदी या कामामध्ये व्यस्त राहिल्याने इतर गाेष्टी विसरतात. त्यामुळे त्यांचं मानसिक अाणि शारीरीक अाराेग्य चांगले राहते. त्याचबराेबर या कामाच्या पैशांमधून ते स्वतःच्या गरजा देखील भागवू शकतात.