पंतप्रधानांनीच आता लक्ष द्यावे
By Admin | Updated: August 20, 2015 02:23 IST2015-08-20T02:23:33+5:302015-08-20T02:23:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता ‘एफटीआयआय’च्या प्रश्नात लक्ष घालावे व गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेची देशभर होत असलेली बदनामी थांबवावी

पंतप्रधानांनीच आता लक्ष द्यावे
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता ‘एफटीआयआय’च्या प्रश्नात लक्ष घालावे व गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेची देशभर होत असलेली बदनामी थांबवावी, अशी मागणी न्यायालयातून जामिनावर सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सायंकाळी एफटीआयआयमध्ये आल्यानंतर केली. गजेंद्र चौहान नको, या मागणीशी ठाम असल्याचे स्पष्ट करून संप सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
संस्थेसाठी आजचा दिवस काळा दिवस होता. पोलिसांना बोलावून आपण संस्था चालवण्यास सक्षम नसल्याचे व्यवस्थापनाने दाखवून दिले, अशी टीका त्यांनी केली. मंगळवारी रात्री अटक झाल्यानंतरचा सर्व घटनाक्रम हिमांशू प्रजापती, राजू बिश्वास व अन्य तीन विद्यार्थ्यांनी पत्रकारांना सांगितला. रात्री १२ वाजता पोलीस आले. त्यांच्याजवळ १६ जणांची नावे होती. त्यात तीन मुली होत्या. सर्वांना अटक करणार, असे त्यांनी सांगितले.
आम्ही संचालक, रजिस्ट्रार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दरवाजासुद्धा उघडला नाही. आमच्या वकिलांशी बोलल्यानंतर त्यांनीसुद्धा इतक्या रात्री पोलीस आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
पोलिसांनी मुलींना अटक करणार नाही असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार ५ जणांनी अटक करून घेण्याची तयारी दाखवली. त्याप्रमाणे आम्हाला डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराची करतात त्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी, हातांचे ठसे अशी कारवाई झाली. पोलीस ठाण्यातच झोपावे लागले. सकाळी न्यायालयात नेल्यानंतर तिथे असीम सरोदे, श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली. जामिनावर सुटका करताना न्यायालयानेही संस्थेच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले व इतक्या रात्री पोलीस कारवाईची गरज नव्हती, असे मत व्यक्त केल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. १ सप्टेंबरला आता पुन्हा न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले हा संचालक प्रशांत पाठराबे यांचा आरोप विद्यार्थ्यांनी खोडून काढला. त्या बैठकीचे चित्रीकरणही न्यायालयात आज सादर करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या चौहान यांच्या नियुक्तीवरून देशभरात संस्थेची बदनामी होत आहे.
हा प्रश्न आता फक्त पुण्याचा किंवा एखाद्या राज्याचा राहिलेला नसून देशाचा झाला आहे. संप असाच सुरू राहिला तर तो देशातील सर्व विद्यार्थ्यांचा होईल. आता तरी पंतप्रधानांनी यात लक्ष घालावे व या नावाजलेल्या संस्थेची बदनामी थांबवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. (प्रतिनिधी)