बसथांब्यांच्या किमतीचे गौडबंगाल
By Admin | Updated: August 14, 2015 03:05 IST2015-08-14T03:05:38+5:302015-08-14T03:05:38+5:30
शहरातील बसप्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनसनाकडून आवश्यकता नसतानाही उभारल्या जाणाऱ्या स्टिलच्या बसथांब्यांच्या

बसथांब्यांच्या किमतीचे गौडबंगाल
पुणे : शहरातील बसप्रवाशांना सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनसनाकडून आवश्यकता नसतानाही उभारल्या जाणाऱ्या स्टिलच्या बसथांब्यांच्या किमतीमध्ये गौडबंगाल असल्याचा प्रकार समोर आला आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून आमदार निधीतून महापालिकेने शहरात उभारलेल्या स्टिलच्या थांब्यांची किंमत ३ लाख असताना, नगरसेवकांच्या निधीतून क्षेत्रीय कार्यालयाने उभारलेल्या बसथांब्यांसाठी तब्बल सात लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही बसथांबे एकसारखे असतानाही त्यांची किंमत वेगळी कशी, असा प्रश्न या प्रकाराने उपस्थित झाला आहे.
नगर रस्ता परिसरातील प्रभाग तीनमध्ये क्षेत्रीय कार्यालयाने उभारलेल्या बसथांब्यांची माहिती विमाननगर सिटीजन फोरमच्या कनीज सुखरानी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे मागितली होती. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत प्रभागात उभारलेल्या थांब्यांची माहिती दिली आहे. त्यात त्यानुसार, फॉर्च्यून हॉटेल समोर उभारलेल्या थांब्यासाठी ५ लाख ५७ हजार रुपये, बँक आॅफ बडोदा जवळील थांब्यासाठी ५ लाख ३२ हजार रुपये, गंगापूरम येथे उभारलेल्या थांब्यासाठी ५ लाख ६५ हजार रुपये तर, इनॉर्बिट मॉल येथे उभारलेल्या थांब्यासाठी तब्बल ७ लाख ९ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कामासाठी २० लाखांची तरतूद असताना तब्बल २३ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, याच प्रभागाशेजारी असलेल्या प्रभाग क्रमांक १८मध्ये याच क्षेत्रीय कार्यालयाने स्टिलचे अशाच प्रकारचे २ बसथांबे उभारले असून, अवघा ४ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे प्रभाग तीनमधील थांब्यांच्या कामात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी सुखराणी यांनी केली आहे.