आपत्कालीन कृती आराखडा तयार
By Admin | Updated: May 31, 2014 07:07 IST2014-05-31T07:07:44+5:302014-05-31T07:07:44+5:30
महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य दिले असून, नालेसफाई, नदीतील जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे

आपत्कालीन कृती आराखडा तयार
पिंपरी : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या कामांना प्राधान्य दिले असून, नालेसफाई, नदीतील जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या निविदा प्रक्रियेस अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करून महापालिकेने आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीची कामे करून घेतली आहेत. आपत्कालीन परिस्थिती कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानाला प्राधान्य दिले. त्यामुळे गटारे, नालेसफाईची कामेही झाली आहेत. प्रभाग स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याची जबाबदारी आयुक्त जाधव यांनी प्रभाग अधिकार्यांवर सोपवली आहे. त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंते, आरोग्य निरीक्षक, मुकादम यांना सूचना दिल्या असल्याने स्वच्छतेची कामे बर्यापैकी झाली आहेत. पावसाळ्यात पवना नदीस पूर आल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी नुकतीच क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सहा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासकीय इमारतीत मुख्य पूरनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एकूण सात ठिकाणी स्थापन केलेल्या पूरनियंत्रण कक्षाची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असेल. हेल्पलाइन सुविधेचा वापर करून ते आपत्कालीन परिस्थितीबाबत या नियंत्रण कक्षाला कळवतील. आवश्यक ती तातडीची मदत पुरविण्याचे काम कक्षातर्फे केले जाईल. नदीपात्रालगतची अतिक्रमणे हटवावीत, नदीकाठी राहणार्या रहिवाशांना पुराच्या धोक्याबाबत पूर्वकल्पना देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार संबंधित रहिवाशांना नोटीस पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. या वर्षी पहिल्यांदाच पुलाच्या ठिकाणी पाण्याच्या पातळीचे प्रमाण लक्षात येण्यासाठी मार्किंग करण्यात येणार आहे. पाटबंधारे खात्यामार्फत चिंचवड, रावेत, सांगवी, पिंपरी, पिंपळे सौदागर या ठिकाणी पुलाला मार्किंग केले जाणार आहे.(प्रतिनिधी)