पुणे : रविवारी पहाटे पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने खराडीतील स्टे बर्ड हॉटेलवर छापा मारून ड्रग्ज पार्टी करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हा या पार्टीचा आयोजक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ध्यरात्रीनंतर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. तेथे ५ पुरुष आणि २ महिला रेव्ह पार्टी करताना आढळले. त्यात दारू, हुक्का यासह अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे दिसून आले. यावेळी कोकेन आणि गांजा सदृश्य अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत. दरम्यान, अटक केलेल्यांची पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून, त्यांचे ब्लड सॅम्पलदेखील घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. आता या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याबाबत वैद्यकीय तपासणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ड्रग्सचे सेवन केले होते का नाही? हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
आरोपींपैकी निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव यांच्यावर यापूर्वी पुण्यासह मुंबईत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सातही जणांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींकडे मिळालेले अमली पदार्थ त्यांनी कोठून आणले, त्याचा तपास करायचा आहे. स्टे बर्ड हॉटेलमध्ये २५ ते २८ जुलै दरम्यान एकूण तीन रूम बुक केलेल्या आहेत. त्याबाबत आरोपीकडे अधिक तपास करायचा आहे. हॉटेलच्या आवारात तीन महिला येऊन गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. या गुन्ह्यातील पोपटाणी आणि यादव हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे. आरोपीकडून जप्त केलेले गांजा व कोकेनसदृश पदार्थ अवैध व्यवसायासाठी संगनमताने टोळी निर्माण केली आहे काय, याचा तपास करायचा आहे.