पुणे : प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपचा सर्व डेटा नाहीसा झाला असून, अशाप्रकारे पुरावा नष्ट झाल्याचा प्रकार घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खेवलकर याला जामीन मंजूर झाल्यास पुराव्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत पोलिसांनी खेवलकरच्या जामीन अर्जाला सोमवारी (दि. २५) विरोध दर्शविला. दरम्यान, पोलिसांनी जामिनाला विरोध करणारे लेखी म्हणणे सादर केल्यानंतर त्यावर युक्तिवाद करण्यासाठी बचाव पक्षाने मुदत मागितली आहे. त्यानुसार प्रांजल खेवलकर याच्या जामीन अर्जावरील अंतिम युक्तिवादाची पुढील सुनावणी दि. ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर याने जामिनासाठी विशेष (एनडीपीएस) सत्र न्यायाधीश जे. जी. डोर्ले यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. तपास अधिकारी प्रशांत अन्नछत्रे यांनी आरोपीच्या जामीन अर्जास विरोध केला. आरोपी खेवलकर याच्या जप्त केलेल्या आयफोनचा सायबर तज्ज्ञानी पंचनामा केला.
तेव्हा व्हॉट्सॲपच्या डेटामध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे दिसून आले होते. त्यात डॉ. खेवलकर यांनी वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टीमध्ये व पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सापडले होते. मात्र, ६ ऑगस्ट रोजी आयफोनचा उर्वरित इंटरनेटचा पंचनामा चालू असताना दि. ४ ऑगस्ट रोजी जळगाव येथील मूळ मालकाने या मोबाईल क्रमांकाचे नवीन सीमकार्ड घेऊन ते नवीन मोबाईलमध्ये टाकले आणि मोबाईल क्रमांक ॲक्टिव्हेट केला असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या आयफोनमधील व्हॉट्सॲपचा सर्व डेटा निघून गेला आहे. अशाप्रकारे पुरावा नष्ट झाल्याचा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
सरकारी वकिलांनी प्रांजल खेवलकर याच्या जामीन अर्जावर त्यांचे म्हणणे दाखल केले आहे आणि खेवलकरसह इतर सर्व आरोपींच्या जामिनाला विरोध केला आहे. प्रांजल खेवलकर याच्यावतीने ॲड. ऋषिकेश गानू आणि ॲड. पुष्कर दुर्गे काम पाहत आहेत. पोलिसांच्या लेखी म्हणण्यावर युक्तिवाद करण्यासाठी बचाव पक्षाने मुदत मागितली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यताराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवीन सीमकार्ड घेऊन पोलिसांकडील जप्त मोबाइलवरील डाटा नष्ट केल्याचे पोलिसांनी जामीन नामंजूर करण्यासाठी दिलेल्या कारणामध्ये दिसून येतात. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा याप्रकरणात दाखल होऊ शकतो. प्रांजल खेवलकर यांच्याकडील मोबाइलचे मूळ मालक कोण हे पोलिसांनी स्पष्ट केले नसले तरी त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्याकडे निर्देश दिले जात आहे.