वापराच्या कालावधीनुसार ठरणार वीजदर
By Admin | Updated: July 19, 2014 03:24 IST2014-07-19T03:24:21+5:302014-07-19T03:24:21+5:30
दिवसातील ज्या काळात सर्वाधिक वीजवापर होतो, त्या काळातील वीज महाग; तर सरासरी कमी वापर असलेल्या काळातील वीजदर स्वस्त ठेवण्याच्या प्रस्तावावर महावितरण विचार करीत आहे

वापराच्या कालावधीनुसार ठरणार वीजदर
पुणे : दिवसातील ज्या काळात सर्वाधिक वीजवापर होतो, त्या काळातील वीज महाग; तर सरासरी कमी वापर असलेल्या काळातील वीजदर स्वस्त ठेवण्याच्या प्रस्तावावर महावितरण विचार करीत आहे. यासाठी ग्राहकांच्या विद्युत मीटरला टाइम आॅफ डे (टीओडी) मीटर लावण्यात येतील. हा प्रस्ताव मान्य झाल्यास साहजिकच सायंकाळच्या वेळेतील वीज महाग होणार असून, रात्री उशिरा व दिवसाच्या काळातील वीजदर स्वस्त होतील.
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे एमएसईबी इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘मिशन महापॉवर’ कार्यशाळेत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी ही माहिती दिली.
मेहता म्हणाले, ‘‘ अधिक वीज वारणाऱ्याला अधिक वीजदराचे सूत्र अवलंबावे लागेल. तसेच, कमी वीजवापर करणाऱ्या शेतकऱ्याला कमी बिल, अशी पद्धत वापरली पाहिजे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे. अचूक मीटर रीडिंग, बिल देण्यासाठी ‘कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’चा वापर करावा लागेल.’’ चुकीचे वीजबिल देण्यावर मर्यादा आणाव्या लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घरगुती, कृषी व इतर २ कोटी ग्राहकांना अनुदान देण्यात येते. त्याचा बोजा १८ लाख औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांवर पडत असल्याचे मेहता म्हणाले. (प्रतिनिधी)