‘रोझलॅण्ड’कडून वीजबचतीचा संदेश
By Admin | Updated: June 18, 2015 23:54 IST2015-06-18T23:54:44+5:302015-06-18T23:54:44+5:30
विजेची बचत करून पर्यावरण संवर्धनाची मोहीम जागतिक स्तरावर राबविली जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वीज वाचविण्याचा खटाटोप सरकारी यंत्रणा

‘रोझलॅण्ड’कडून वीजबचतीचा संदेश
मिलिंद कांबळे , पिंपरी
विजेची बचत करून पर्यावरण संवर्धनाची मोहीम जागतिक स्तरावर राबविली जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वीज वाचविण्याचा खटाटोप सरकारी यंत्रणा आणि काही सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. या पद्धतीने पिंपळे सौदागर येथील एका हौसिंग सोसायटीने इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि जोडणीत बदल करीत दोन वर्षात तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त युनिट विजेची बचत केली आहे. हा आदर्श शहरातील इतर काही हौसिंग सोसायटींनी घेतला आहे.
पिंपळे सौदागर येथील रोझलॅन्ड रेसिडन्सी हौसिंग सोसायटीने हा उपक्रम यशस्वी करीत एक आदर्श निर्माण केला आहे. येथे ३० इमारती आणि ४० रो हाऊस असून, एकूण १ हजार ८० सदनिकाधारक आहेत. सोसायटीचा सर्वाधिक खर्च वीज बिलापोटी होत होता. महिन्यास पाच ते सव्वा पाच लाख रुपये केवळ वीज बिल येत होते. यासाठी विजेचे आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासनाच्या मदतीने सेव्हन इंडिया एनर्जीकडून जानेवारी २०१३ मध्ये आॅडिट करून घेण्यात आले. प्रत्यक्ष वीज बचतीचा उपक्रम जून २०१३ पासून सुरू झाला. या माध्यमातून पाणी खेचणाऱ्या मोटारीचा पंपात बदल करण्यात आला. पार्किंगमधील ट्यूब बदलून त्याचा आकार छोटा केला गेला. पथदिवे बदलून ते एलईडी करण्यात आले. आवश्यक ठिकाणी जोडणी व दुरुस्ती केली गेली. रात्री एका आड एक पथदिवे सुरू केले जातात. त्यामुळे आहे त्या वापरात शेकडो युनिट वीजवापर कमी होऊन महिन्यास ३ लाख ८० हजार ते ४ लाख १० हजार रुपये बिल येऊ लागले आहे. यासाठी सोसायटीला स्वत: काहीच खर्च करावा लागला नाही. बीओटी तत्त्वावर हा उपक्रम राबवित आहेत.
याबरोबर सोसायटीत ३० पैकी १३ इमारतींमध्ये ‘रेन हार्वेस्टिंग’ यंत्रणा बसवून पावसाच्या पाण्याची बचत करून, त्याचा पुनर्वापर केला जात आहे. यामुळे बोअरिंगच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सोसायटीत सन २०१०पासून एकदाही पाण्याचा टँकर मागवावा लागला नाही. तसेच, सोसायटीच्या आवारात आंबा, चिकू, सीताफळ, बदाम, अर्जुन, जांभूळ, चिंच, बोर, कडूलिंब, वड, पिंपळ आदी फळांची झाडे लावली आहेत. त्यामुळे परिसरात नेहमी स्वच्छ हवा खेळती राहते. तसेच, पक्ष्यांचे वास्तव्य वाढले आहे. पालापाचोळ्यापासून खत निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. सदस्यांच्या अडचणीचा त्वरित निपटारा व्हावा म्हणून पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून तक्रार, सूचना, कारवाईची माहिती त्वरित मोबाईलवर समजते. अंतर्गत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
आवारात स्वस्त दरात भाजीपाला आणि फळ विक्री केंद्र सुरू केले आहे. पर्यावरणपूरक उपक्रमामुळे सोसायटीला खासगी संस्थेतर्फे आदर्श सोसायटीचा पुरस्कार मिळाला आहे.
- या माध्यमातून वीजबचतीचा यशस्वी उपक्रम राबवीत सोसायटीने पर्यावरण संवर्धनास हातभार लावला आहे. सुरुवातीच्या एका वर्षात ९१ हजार ३८९ युनिट वीज वाचविण्यात आली. त्यामुळे सोसायटीचे १ लाख ३९० रुपये खर्च वाचला. जून २०१५ पर्यंत ३ लाख १० हजार युनिट वीज बचतीचे उद्दिष्ट असून, जवळजवळ पूर्ण झाले आहे.
खर्चात बचत करण्याचे धोरण ठरवून वीज खर्च कमी करण्यावर भर दिला. आॅडिट केल्याने कोणत्या कारणासाठी अधिक वीज खर्च होते समजले. त्या दृष्टीने काम करीत वीज बचतीचे उद्देश पूर्ण करीत आहोत. हा उपक्रम पाहून शहरातील काही सोसायट्यांनी त्याचा अवलंब सुरू केला आहे. भविष्यात विजेसाठी सौर पॅनेलचा वापर करण्याचे नियोजन आहे.
- संतोष म्हसकर, अध्यक्ष, रोझलॅण्ड सोसायटी