Pune Crime news: नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलजवळ ट्रकचा कारला धक्का लागला. कारमधून दोन लोक उतरले. त्यांनी ट्रकचालकाला खाली उतरवून कारमध्ये बसवले आणि घेऊन गेले. ट्रकचालक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. तपास करत पोलीस पोहोचले थेट पूजा खेडकरच्या आईच्या घरी म्हणजे मनोरमा खेडकरच्या. मनोरमा खेडकरने नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण केलं आणि त्याला पुण्यात नेऊन घरात डांबून ठेवलं होतं.
पोलिसांनी चालकाची सुटका केली. पण , मनोरमा खेडकरचा मस्तवालपणा कायम आहे. चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने हुज्जत घातली आणि दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी तिला समन्स बजावले आहे.
काय घडलं?
नवी मुंबईतील सिग्नलवर ट्रकचा एका कारला धक्का लागला. ही कार मनोरमा खेडकरची असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हापासून ट्रकचालक बेपत्ता होता. प्रल्हाद कुमार असे ट्रकचालकाचे नाव असून, तो मिक्सर ट्रक घेऊन निघाला होता. पण, कारला (एमएच१२ आरटी५०००) ट्रकचा धक्का लागला.
कारला धक्का लागल्यानंतर दोन लोक कारमधून उतरले आणि त्यांनी बळजबरी ट्रकचालकाला खाली उतरवले. त्यानंतर त्यांनी चालकाला कारमध्ये बसवले आणि निघून गेले.
ट्रकचालक सापडला मनोरमा खेडकरच्या घरात
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कारचा ठिकाणा शोधला. ही कार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील घराबाहेर दिसली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा चालकाला घरात डांबून ठेवलेले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी चालकाला घरातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. दरवाजा उघडण्यास नकार दिला. पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखले. त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांना समन्स बजावले आहे.