डाळिंबाची माती!
By Admin | Updated: August 11, 2015 03:44 IST2015-08-11T03:44:49+5:302015-08-11T03:44:49+5:30
लाखो रुपये खर्च केले, पोटच्या लेकराप्रमाणे बागा सांभाळल्या, बागाही फळांनी लगडून गेल्या. मात्र तेल्याने लाखमोलाच्या डाळिंबांची अक्षरश: माती केली. अनेक उपाय करून पाहिले;

डाळिंबाची माती!
- रविकिरण सासवडे, बारामती
लाखो रुपये खर्च केले, पोटच्या लेकराप्रमाणे बागा सांभाळल्या, बागाही फळांनी लगडून गेल्या. मात्र तेल्याने लाखमोलाच्या डाळिंबांची अक्षरश: माती केली. अनेक उपाय करून पाहिले; मात्र तेल्या दाद देईना. बागा वाचविण्यासाठी आता शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी शेकडो एकरावरील बागा तोडून काढल्या. आता बागांसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
बारामती-इंदापूर तालुक्यात खात्रीशीर उत्पन्न म्हणून शेतकऱ्यांनी शेकडो एकरावर डाळिंब बागांची लागवड केली. माळरानाची मुरमाड जमीन डाळिंब बागांना मानवत असल्याने माळरानावर मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड झाली. इंदापूर तालुक्यातील जिरायती पट्ट्याला या डाळिंब बागांनी खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत मिळवून दिला. या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात डाळिंब बागांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक परिवर्तन घडवले. अगदी कोटींच्या घरात डाळिंबाचे उत्पन्न घेणारे शेतकरी या परिसरात पाहावयास मिळतात. अगदी शेतमजूर डाळिंब बागायतदार झाला. बागायती भागातील शेतकऱ्यांच्या
उत्पन्नापेक्षाही अनेकपटींनी येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून या भागात तेल्या रोगाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.
तेल्यापासून बागा वाचविण्यासाठी महागडी औषधे वापरली. मात्र तेल्याने काही दाद दिली नाही. कोट्यवधी उत्पन्न देणाऱ्या बागा एका क्षणात नष्ट झाल्या. तेल्याने बाधित फळे रस्त्यांवर फेकून देण्याची वेळ आली. रोगाचा जास्त प्रसार होऊ नये, म्हणून बाधित फळे शेतकऱ्यांनी जाळून टाकली. दर वर्षी मोठा आर्थिक फायदा मिळवून देणारी डाळिंबबाग यंदा सरपणावर विकावी लागली. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनही तेल्यामुळे कोलमडले आहे.
तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. इंदापूर तालुक्यातील डाळींब बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिबंंधात्मक उपायांवर शेतकऱ्यांनी भर दिल्यास रोग आटोक्यात येण्यास मदत होऊ शकते.
- एस. जे. जाधव
तालुका कृषी अधिकारी, इंदापूर
बारामती तालुक्यातील एकूण लागवडी पैकी साधारण ६० ते ६५ टक्के क्षेत्रावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या क्षेत्राचे सध्या सर्व्हेक्षण सुरू आहे. तेल्या येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी एकच बहर धरावा. औषध फवारणी देखील एकाचवेळी करावी. असे केल्यास तेल्या रोगाला काहीप्रमाणात पायबंद बसेल.
- संतोषकुमार बरकडे
तालुका कृषी अधिकारी, बारामती
माझ्या डाळींब बागेचे तेल्यामुळे ६० ते ७० टक्के नुकसान झाले. झालेला खर्चही निघाला नाही. मजुरीचे पैशासाठी देखील उसणवारी करावी लागली. बागेतील रोगग्रस्त फळे काढून जाळली. औषध फवारणीही केली. परंतु तेल्या आटोक्यात आला नाही. वातावरण सारखे बदलते त्यामुळेही रोगाचा फैलाव मोठ्याप्रमाणात होत आहे.
- सतीश अप्पा सांगळे
डाळींब उत्पादक शेतकरी, बिरंगुडी, (ता. इंदापूर)