जिल्ह्यात १७५ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:24 AM2018-11-30T01:24:18+5:302018-11-30T01:24:21+5:30

पाणी व स्वच्छता आणि आरोग्य विभागांकडून तपासणी : २ हजार ६७८ नमुन्यांची तपासणी

Polluted water samples of 175 places in the district | जिल्ह्यात १७५ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित

जिल्ह्यात १७५ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित

Next

पुणे : जिल्ह्यात रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच साथीचे आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता आणि आरोग्य विभागांकडून जिल्ह्यातील २ हजार ६७८ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत जवळपास १७५ ठिकाणचे पाण्याचे स्रोत हे दूषित असल्याचे आढळले. यात खेड तालुक्यात सर्वाधिक दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात तसेच क्लोरीन पावडर पुरविण्यात यावी, असे आदेश गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.


जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाझर तलाव, कूपनलिका, नद्या तसेच विंधन विहिरींतून पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी नळपाणी पुरवठा योजनांमधून नळाद्वारे पाणी पुरवले जाते. मात्र, या ठिकाणांवरून दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. यामुळे आजार बळावण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता आणि आरोग्य विभागाकडून नागरिक पीत असलेले पाणी शुद्ध आहे का, याची तपासणी करण्यात आली.


यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पाण्याच्या मुख्य स्रोतांची तपासणी करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात १३ तालुक्यांत ही तपासणी करण्यात आली होती. प्रशासानतर्फे २ हजार ६७८ ठिकाणांचे नमुने तपासले गेले. यात जवळपास पाण्याच्या १७५ ठिकाणी नागरिक दूषित पाणी पीत असल्याचे आढळून आले. खेड तालुक्यात २९४ ठिकाणी तपासणी करण्यात आली. यातील ३९ ठिकाणी पाणी दूषित असल्याचे आढळले. ६ महिन्यांपूर्वी केलेल्या तपासणीत ५९ ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले होते. त्यापाठोपाठ आंबेगाव तालुक्यात
३१० ठिकाणी केलेल्या तपासणीतून २९ ठिकाणी दूषित पाण्याचे साठे आढळून आले.



आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागाकडून पाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पाण्याच्या शुद्धतेसाठी ‘टीसीएलह्णचा वापर प्रामुख्याने केला जातो. त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण हे २० टक्के आदर्श मानले जाते.
क्लोरीनचे त्यापेक्षा कमी प्रमाण असल्यास त्याचा जास्त प्रमाणात वापर करावा लागतो. दूषित पाणी प्यायल्याने जुलाब, उलट्या, पोटदुखी, टायफॉईड, गॅस्ट्रो, विषाणू, जिवाणूंचे आजार, जंतूंची वाढ यासारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात.
जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते. त्यामुळे नागरिकांनी दूषित पाणी पिऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. दूषित पाणी आढळले तर त्याबाबत आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहनही जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.



जिल्ह्यात पाण्याच्या तपासलेल्या नमुन्यांची आकडेवाडी (एप्रिल २०१८)
तालुका तपासलेले नमुने दूषित पाणी
आंबेगाव ३१० २९
बारामती २६२ 0६
भोर १५३ ११
दौंड १९० 0७
हवेली १८५ 0१
इंदापूर २५५ 0९
जुन्नर २५६ २१
खेड २९४ ३९
मावळ २०३ 0०
मुळशी ८० १४
पुरंदर १८१ १३
शिरूर २५४ २५
वेल्हे ५५ 0०

Web Title: Polluted water samples of 175 places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.