राजीनाम्यावरून राजकारण
By Admin | Updated: February 11, 2016 03:15 IST2016-02-11T03:15:28+5:302016-02-11T03:15:28+5:30
उपमहापौर आबा बागुल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या शहर शाखेत आता राजकारण सुरू झाले आहे. ‘आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये

राजीनाम्यावरून राजकारण
पुणे : उपमहापौर आबा बागुल यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसच्या शहर शाखेत आता राजकारण सुरू झाले आहे. ‘आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये बदल व्हावेत,’ असे मत प्रदेशाध्यक्षांसमोर मांडले असल्याचे त्यांच्याकडेच राजीनामा सुपूर्त केलेल्या आबा बागुल यांनी आज सांगितले, तर शहराध्यक्ष अभय छाजेड ‘बागूल यांनी राजीनामा दिला’ याशिवाय दुसरे काहीही बोलायला तयार नव्हते.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे बागुल यांनी दिलेला राजीनामा आजच महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे काँग्रेसकडून देण्यात येणार होता; मात्र बागुल आज पालिकेत आलेच नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचा राजीनामा देता येत नसल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अडचण झाली. महापौरांनी बागुल यांना विचारणा केली असता त्यांनी आपण ‘मुंबईत’ असल्याचे सांगितले. त्यामुळे छाजेड व त्यांच्यासमवेत असलेले पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी ‘बागुल यांनी राजीनामा दिला आहे’ एवढेच सांगितले. दरम्यान, आपल्या राजीनाम्याची पक्षाच्या याच दोन पदाधिकाऱ्यांना इतकी घाई का, असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत सहभागी करून घेतेलेले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने पदांच्या वाटपात काँग्रेसला फसवले आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
यंदा अखेरच्या वर्षी सावध राहणे गरजेचे आहे. या वर्षात स्थायी समितीचे अध्यक्षपद, किमान १० प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याची हमी राष्ट्रवादीकडून घ्यावी, असे बागुल यांचे म्हणणे आहे. प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा देताना आपण ही भूमिका मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपमहापौरांबरोबर गटनेते, शहराध्यक्ष पदांमध्येही बदल केला तर नव्यांना संधी मिळेल, असे मतही चव्हाण यांच्याकडे व्यक्त केले असल्याचे बागुल म्हणाले.