द्वेषाचे राजकारण विनाशाकडे घेऊन जाणारे - डॉ. राम पुनयानी
By श्रीकिशन काळे | Updated: January 7, 2024 19:03 IST2024-01-07T19:03:21+5:302024-01-07T19:03:30+5:30
आपण सर्वांनी प्रेम, सद्भावना वाढवणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे

द्वेषाचे राजकारण विनाशाकडे घेऊन जाणारे - डॉ. राम पुनयानी
पुणे : द्वेषाचे राजकारण नाशाकडे घेऊन जाते. पाकिस्तान हे त्याचे उदाहरण आपण पाहत आहोत. त्यामुळे विविधतेत एकता मानणाऱ्या भारताला द्वेषाच्या मार्गाने नाशाकडे नेण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत, तो प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नयेत. आपण सर्वांनी प्रेम, सद्भावना वाढवणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी रविवारी येथे केले.
विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचारवेध संमेलनातील दुसऱ्या दिवशीच्या सत्राला रविवारी सकाळी गांधी भवन येथे प्रारंभ झाला. यावेळी डॉ. राम पुनियानी बोलत होते. पहिल्या दिवशीच्या सत्रात (दि.६) ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांनी मार्गदर्शन केले होते. या संमेलनात भारत जोडो आंदोलनाच्या वतीने निरंजन टकले यांच्या हस्ते 'सावित्रीच्या लेकी ' पुरस्कार मंगला पाटील, अरुंधती गडाळे, प्रतिभा भोसले, त्रिवेणी गव्हाळे यांना देण्यात आला. यावेळी आनंद करंदीकर, हरीश सदानी उपस्थित होते.
डॉ. पुनियानी म्हणाले, 'आधीच्या लढाया टोळ्यांमधील, राजा राजांमधील, सत्तांमधील असायच्या. तरीही आज तो इतिहास बदलताना त्यांना हिंदू- मुस्लीम लढायांचे रुप दिले जात आहे. भाजप सत्तेवर आल्यावर हे प्रयत्न वाढले. या लढायांकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. द्वेष वाढविण्यासाठी हा प्रचार वाढविला जात आहे. भारतीय संस्कृती ही बंधूभाव, सद्भाव मानणारी ' मिली जुली ' अशी संस्कृती आहे. भारतीय आणि भारताबाहेरील पदार्थांचा मिलाफ झालेला आहे. अनेक शब्द, पेहराव इथे स्वीकारले आहेत. हिंदी सिनेमातील सुंदर भजने लिहिणाऱ्या, गाणाऱ्या नावात मुस्लीम गायक, कलाकार आहेत. त्यांना आपण भारतीय म्हणूनच ओळखतो.’’
धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे. संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत. प्रत्यक्षात भारत हा विविधतेत आनंद मानणारा देश आहे. भारतात बाहेरुन विविध लोक येत राहिले आहेत.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम आणि सर्व जण एकत्रित लढत होते. धर्माच्या नावावर लढणारे मात्र स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. आपण मिळवलेले स्वातंत्र्य आपल्याला जपायचे आहे. म्हणून इथुन पुढे संवैधानिक मूल्य रक्षणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. - डॉ. राम पुनयानी, ज्येष्ठ विचारवंत