मॉब पोलसाठी राजकीय पक्ष उदासीन

By Admin | Updated: September 11, 2014 04:39 IST2014-09-11T04:39:30+5:302014-09-11T04:39:30+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून हजारो नावे गायब झाल्यानंतर गोंधळ घालणारे राजकीय पक्ष अजूनही शहाणे झाले नसून विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली

Political party depressed for the MOB poll | मॉब पोलसाठी राजकीय पक्ष उदासीन

मॉब पोलसाठी राजकीय पक्ष उदासीन

पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदार यादीतून हजारो नावे गायब झाल्यानंतर गोंधळ घालणारे राजकीय पक्ष अजूनही शहाणे झाले नसून विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया जास्तीतजास्त निर्दोष व्हावी, यासाठी प्रशासनाने वेळोवेळी सर्व राजकीय पक्षांना बोलवले होते़ पण, अजूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले़
शिवाजीनगर गोदामात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची तपासणी सुरू आहे़ पुणे जिल्ह्यासाठी जवळपास १० हजार मशीन लागणार आहेत़ त्यासाठी उत्तर प्रदेशातून मशीन आणण्यात आली आहे़ त्यातील ८ हजार ५०० कंट्रोल मशीन आणि १२ हजार २०० बॅलेट युनिटची तपासणी इलेक्ट्रॉनिक कॉपोरेशन आॅफ इंडियाचे २१ अभियंता करीत आहेत़ सध्या या मशीनवरील जुना डाटा काढून टाकून ती सील करण्याचे काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे़ पुढील काही दिवसांत बिहारमधून ७ हजार मशीन आणण्यात येणार आहेत़
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार त्यातील ५ टक्के मशीनमध्ये प्रत्येकी १ हजार मते टाकून ती व्यवस्थित काम करीत आहे, हे तपासण्यास सांगण्यात आले आहे़ त्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेण्यास सांगितले आहे़ यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांना आतापर्यंत तीन वेळा पत्रे पाठवून ही मशीन तपासण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठविण्याचे कळविले आहे़ या मॉब पोलसाठी आज सकाळी ११ वाजता शिवाजीनगर येथील शासकीय गोदामात उपस्थित राहण्यास सांगितले होते़ काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड़ अभय छाजेड यांनी तसे सर्व ब्लॉक अध्यक्षांना कळविले़ पण त्यापैकी चौघेच सकाळी उपस्थित होते़ त्यांनी दिवसभर थांबून मॉब पोल करून तपासणी केली़ अन्य पक्षांनी या पत्राची दखलही घेतली नाही़
लोकसभा निवडणुकीत हजारो मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याचा अनुभव आला होता़ अनेकांनी व्होटिंग मशीनविषयी शंका उपस्थित केल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया अधिक निर्दोष व्हावी, मतदार यादीतील चुका, त्याविषयीची माहिती देण्यासाठी यापूर्वीही विधानसभानिहाय निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बोलविले होते़ पण, अपवाद वगळता कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Political party depressed for the MOB poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.