प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप?
By Admin | Updated: September 8, 2016 01:25 IST2016-09-08T01:25:58+5:302016-09-08T01:25:58+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे.

प्रारूप प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. प्रारूप प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला असून, सोईस्करपणे रचना करून घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता आहे. ही सत्ता अबाधित ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. तर केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने महापालिकेवर झेंडा फडकाविण्याचा मनसुबा भारतीय जनता पक्षाने रचला आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. गैरव्यवहाराची एकामागून एक प्रकरणे उकरून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरीच्या राजकारणात लक्ष घातले आहे. संघनीतीचा वापर करून भाजपाने व्यूहरचनाही केली आहे.
महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा प्रारूप प्रभागरचनेचा आहे. राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या वर्षी गुगल अर्थचा वापर करून प्रभागाची रचना करावी, असे आदेश दिले आहेत. नद्या, प्रमुख रस्ते, रेल्वेलाईन, वसाहती, सोसायट्या न तोडता रचना करावी, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या वर्षीची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून आयुक्तांनी हा आराखडा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना आज सादर केला.
प्रभागरचनेचा आराखडा सादर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपले प्रभाग सोईस्करपणे तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरले आहे. गेल्या आठवडाभरात निवडणूक विभागात विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्या फेऱ्या वाढल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाला प्रारूप आराखडा सादर होण्यापूर्वीच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला असून, प्रभाग सोईस्करपणे तोडून राजकीय हित जोपासल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)