राजकीय वादात भोर शहर झाले भकास!
By Admin | Updated: August 10, 2015 02:59 IST2015-08-10T02:59:25+5:302015-08-10T02:59:25+5:30
नगरपलिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्या वादात दोन वर्र्षांपासून भोर शहरातील विकासकामे ठप्प आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे,

राजकीय वादात भोर शहर झाले भकास!
भोर : नगरपलिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्या वादात दोन वर्र्षांपासून भोर शहरातील विकासकामे ठप्प आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, पाणडी दिवसाआढ तेही गढूळ येत आहे. घंटागाड्या बंद असल्याने केरकचरा रस्त्यावर पडत घाणीचे साम्राज्य झाले आहे. पलिकेवर कोणाचा अंकुश राहिला नसून जनता मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
नगर परिषदेतील राजकारण शहरातील विकासकामांना खीळ घालणारे ठरत आहेत. नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांच्यातील वाद टोकाला गेल्याने शहरातील प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
मात्र, नगराध्यक्षा आणि नगरसेवक एकमेकांना
कोर्टात खेचण्याची एकही संधी सोडत नाहीत. या वादात नगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने आणखी भर पडली आहे.
भोर नगरपलिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शहरातील नागरिकांनी १७पैकी १३ जागा काँग्रेसला देऊन स्पष्ट बहुमत दिले. तर राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदा दीपाली शेटे नगराध्यक्षा झाल्या. मात्र, सहा महिन्यांतच नगरसेवक आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. दोघांतील वाद इतका टोकाला गेला, की नगराध्यक्षांनी नगरसेवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तर नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी बेकायदेशीर व अनधिकृत बांधकाम केल्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करून नगराध्यक्षांचे पदही घालवले. मात्र सर्वसामान्य नागरिक मूलभूत सुविधांसाठी भरडत आहेत. (वार्ताहर)