‘हायप्रोफाइल’ चोरांमुळे चक्रावले पोलीस
By Admin | Updated: August 10, 2015 02:47 IST2015-08-10T02:47:11+5:302015-08-10T02:47:11+5:30
राहणीमान उच्च दर्जाचे... तो राहतोही मार्केट यार्ड येथील उच्चभ्रू गंगाधाम सोसायटीमध्ये... कॉल सेंटरमध्ये उच्चपदस्थ नोकरी... पण धंदा चोरीचा..
‘हायप्रोफाइल’ चोरांमुळे चक्रावले पोलीस
लक्ष्मण मोरे, पुणे
राहणीमान उच्च दर्जाचे... तो राहतोही मार्केट यार्ड येथील उच्चभ्रू गंगाधाम सोसायटीमध्ये... कॉल सेंटरमध्ये उच्चपदस्थ नोकरी... पण धंदा चोरीचा... या ‘व्हाइट कॉलर’ चोरट्याने गेल्या काही दिवसांत थोड्या-थोडक्या नव्हे, तर तब्बल ५० महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावल्याचे समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल ४० लाखांचे १५० तोळे सोने हस्तगत केले आहे. एका उच्चशिक्षित चोरट्याचा हा प्रताप पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
गिरीश रामदास नायक (वय ५०, रा. फ्लॅट क्रमांक ३०८, एच १, गंगाधाम फेज २, मार्केट यार्ड) असे उच्चभ्रू चोरट्याचे नाव आहे. नायक उच्चशिक्षित असून पत्नी आणि मुलांसोबत तो राहतो. त्याची पत्नीही उच्चशिक्षित आहे. तो सध्या एका कॉलसेंटरमध्ये उच्चपदस्थ म्हणून नोकरीही करीत होता. नायक याला कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या २० दुचाकींसह १ मोटार जप्त करण्यात आली होती. ही चोरलेली वाहने त्याने विजयन शिवनकुमार (वय ४१, रा. एफ ब्लॉक, पॅलेडियम होम्स, धानोरी) याला विकली होती. विजयन याने ही वाहने विना कागदपत्रांचीच नागरिकांना विकली. या वाहनांची ना कधी वाहतूक पोलिसांनी तपासणी केली ना आरटीओने. नायक याच्यावर १९९५ आणि १९९६ साली डेक्कन, कोथरूड, खडक आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या पत्नीला त्याच्या या कृत्यांबद्दल माहिती होती.
या चोरीच्या वाहनांचा वापर करूनच नायकने घराजवळच्या भागात तब्बल ५० महिलांच्या गळ्यातील ऐवज हिसकावला. महागडे कपडे घालून नायक रस्त्यावरून एकटाच फिरायचा. लॉक न केलेल्या दुचाकी हेरून या दुचाकी ढकलत लांबवर न्यायचा. जस्ट डायलवरून चावी बनवणाऱ्यांचे क्रमांक घेऊन त्यांना बोलावून चावी बनवून घ्यायचा. अशा प्रकारे त्याने बिबवेवाडी, सहकारनगर, मार्केट यार्ड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधून २० दुचाकी आणि एक मोटार चोरल्याचे समोर आले. पोलिसांनी ही वाहने जप्त केली आहेत.
या चोऱ्यांची सुरुवात झाली ती एका फायनान्स कंपनीने हप्ते थकल्यामुळे त्याची मोटार उचलून नेल्यानंतर. चोऱ्या करीत असताना तो कधी टोपी तर कधी मास्क वापरत होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमधील उपलब्ध फुटेजमधील एका आरोपीप्रमाणे तो दिसत असल्याचे लक्षात आले. गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, परिमंडल चारचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी त्यादृष्टीने तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिल्यावर सुरुवातीला सोनसाखळीचोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक नितीन अतकरे, सुभाष जाधव, कैलास साळुंके, बशीर सय्यद, राजस शेख, संतोष तानवडे, कैलास आखुटे, गणेश गायकवाड, रमेश राठोड, संतोष सोनावणे, सचिन गायकवाड, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने नायककडून सोनसाखळीचोरीचे तब्बल ४८ गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांसमोर आता मौजमजेची ‘चटक’ भागवण्यासाठी अशा चोऱ्या करणाऱ्यांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे.