पोलिसांनो, पिस्तूल शौकिनांवर चाप ओढा
By Admin | Updated: August 2, 2014 04:16 IST2014-08-02T04:16:43+5:302014-08-02T04:16:43+5:30
पिस्तूल बाळगणे आता काहीजणांचा ‘शौक’ बनला आहे. तर अनेकांकडून केवळ समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे

पोलिसांनो, पिस्तूल शौकिनांवर चाप ओढा
मंगेश पांडे, पिंपरी
पिस्तूल बाळगणे आता काहीजणांचा ‘शौक’ बनला आहे. तर अनेकांकडून केवळ समाजात दहशत निर्माण करण्यासाठी त्याचा वापर होत आहे. पिस्तूलाचा वापर करुन खंडणीवसुली असो की दमबाजी राजरोसपणे केली जात आहे. विनाकारण पिस्तूल घेवून मिरविणारयांची चाचपणी करुन पोलिसांनी ‘आता बास’ म्हणत दहशत माजविणारयांना चाप ओढण्याची गरज निर्माण झाली आहे. परवानाधारकांव्यतिरिक्त अनेकजण बेकायदारित्या पिस्तूलासह वावरत आहेत. शहरात विविध ठिकाणी कारवाई करुन काहीजणांकडून बेकायदा पिस्तूले जप्त
करण्यात आली. मात्र, पिस्तूलाचा धाक दाखवून धमकाविणे आणि गोळीबार अशा घटना थांबलेल्या नाहीत. यासर्व गोष्टी थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पिस्तूलाचे नाव काढले तरी सामान्य नागरिकाच्या ह्दयाची धडधड वाढते. केवळ सिनेमात पाहिलेले पिस्तूल सर्रासपणे अनेकजण घेवून मिरवित असतात. स्वसंरक्षणाचे कारण पुढे करुन पिस्तूल बाळगण्याचा परवाना सहजरित्या मिळविला जातो. या पिस्तूलाचा स्वसंरक्षणाऐवजी कमरेला लावून मिरविणे हा अनेकांचा ‘शौक’ बनला आहे. यामुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण होत आहे.
शहर व परिसरात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय जोरात सुरु आहे. अनेकजण या व्यवसायात उतरले असून स्पर्धाही वाढली आहे. या व्यवसायात आपला दरारा राहण्यासाठी अनेकजण पिस्तूल घेवून आपली ‘वेगळी’ ओळख निर्माण करु पाहत आहेत. पिस्तूलाच्या जोरावर अनेक कामे होत आहेत. सहजरित्या परवाना मिळवून पिस्तूल बाळगणारयांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. तसेच बेकायदा पिस्तूल बाळगणारयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मोहल्ला, गल्लीतील एखाद्या गुन्हेगाराकडेही पिस्तूल असते. छोट्या-मोठ्या चोरीच्या घटनांमध्येही पिस्तूलाचा वापर केला जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वारंवार कारवाई करुन पिस्तूल जप्तीची कारवाई केली जाते.