पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) मेट्रो प्रवाशांना स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी फीडर सेवा सुरू केली आहे. सध्या शहरात २२ मार्गांवर ही फीडर सेवा सुरू आहे. यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सोय झाली असून, याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, जून महिन्यांत फीडर सेवा मार्गांवरून १० लाख ३८ हजार नागरिकांनी प्रवास केला आहे.
महामेट्रोकडून पुण्यात वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. या दोन्ही मार्गांवर एकूण २९ मेट्रो स्टेशन सुरू झाली असून, यातील महत्त्वाच्या आणि पीएमपी सेवा नसलेल्या मेट्रो स्टेशन येथून फीडर सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, तर यातील काही मार्ग मेट्रो स्टेशनपासून वळविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मेट्रो स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना फायदा होत आहे. यातील अपर, नऱ्हे या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून, एका किलोमीटरसाठी मिळणार उत्पन्नदेखील जास्त आहे, तसेच काही मेट्रो स्टेशनवर सुरू केलेल्या फीडर सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यातील पिंपरी रोड (वर्तुळ), हडपसर ते कल्याणीनगर मेट्रो, स्वारगेट ते राजस सोसायटी, रामवाडी ते विमानतळ, नाशिक फाटा ते सेक्टर १२ यादरम्यान धावणाऱ्या फीडर सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच खडकी मेट्रो स्टेशन सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणावरून पीएमपी फीडर सेवा सुरू झाले, तर प्रवाशांना सोयीचे होईल.
फीडर सेवा आकडेवारी
- एकूण फीडर मार्ग - २२
- जून महिन्यातील प्रवासी - १० लाख ३८ हजार
- जून महिन्यातील उत्पन्न - एक कोटी ७२ लाख
सर्वाधिक प्रवासी असलेले मार्ग :
मार्ग ----- ईपीके (एक किमी उत्पन्न)
शिवाजीनगर ते नऱ्हेगाव - ६९
स्वारगेट ते अपर - ७१
धनकवडी ते शिवाजीनर- ६२
मेट्रो प्रवाशांसाठी फीडर सेवा सुरू केली आहे. याला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. नुकतेच नव्याने काही मार्गांवर फीडर सेवा सुरू केली असून, त्यालाही हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी