PMC Elections : नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी सेंटिग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 20:30 IST2025-11-11T20:27:28+5:302025-11-11T20:30:02+5:30
- प्रारूप आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांना दोन-तीन टर्मपासून ठाण मांडून असलेले प्रभागही या आरक्षणामुळे गमवावे लागले आहेत. काहींना प्रभाग महिला राखीव झाल्याने अडचण झाली आहे.

PMC Elections : नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी सेंटिग सुरू
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप आरक्षण साेडतीत अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले आहेत. तर काही माजी नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने पत्नी किंवा मुलीला निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. कुठल्याही परिस्थितीत नगरसेवकपद घरातच ठेवण्यासाठी सेंटिग सुरू झाली आहे.
पालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाली. प्रारूप आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांना दोन-तीन टर्मपासून ठाण मांडून असलेले प्रभागही या आरक्षणामुळे गमवावे लागले आहेत. काहींना प्रभाग महिला राखीव झाल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांची पत्नी किंवा कुटुंबातील महिलेला या जागेवर उभे करावे लागणार आहे किंवा त्यांना खुल्या जागेतून निवडणूक लढवावी लागणार आहे.
इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
आगामी महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे प्रभागाचे राजकीय चित्र स्पष्ट झाल्याने आता माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी काही जणांनी आतापासूनच सेटिंग लावायला सुरुवात केली आहे. सोयीचे आरक्षण पडलेल्या इच्छुकांनी नेत्यांना फोन आणि मेसेज पाठविले आहेत.