पुणे : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार गटाकडून सर्व इच्छुक उमेदवारांना तयारीत राहण्याचा निरोप देण्यात आला आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचीही तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजप-शिंदेसेना यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत न झाल्याने अजित पवार गटाकडून शिंदेसेना नेते उदय सामंत यांच्याशीही बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने महापालिका निवडणुकीतील राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील चर्चांचा गुंता कायम असून, जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रदेश काँग्रेसकडून ‘रेड सिग्नल’ मिळाल्यानंतर शहर काँग्रेसने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला.
तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, अजित पवार गटाकडून ‘घड्याळ’ चिन्हाबाबत आग्रही भूमिका मांडण्यात आल्याने दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटली. यामुळे शनिवारी (दि. २७) अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज भरण्यासाठी कालावधी कमी राहिल्याने युती आघाडीबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अखेर शनिवारी दुपारी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या सर्व ७११ जणांना तयारीत राहण्याचे निरोप पक्ष कार्यालयाकडून देण्यात आले. अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून एकमत न झाल्याने आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार गटाकडून शिंदेसेनेचे नेते उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सांगितले जात असून, वरिष्ठ नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच पुढील दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी २४ तासांत अजित पवार गटाची अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता असून, त्यावरच इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
पुण्यात सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. मात्र जोपर्यंत भाजपची उमेदवारी यादी जाहीर होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची यादी जाहीर होणार नसल्याचे बोलले जात आहे. यामध्ये भाजपने उमेदवारी न दिलेल्या इच्छुकांवर राष्ट्रवादी अजित पवार तसेच महाविकास आघाडीचा डोळा असणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारी यादीनंतरच कोण कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
Web Summary : Pune NCP faction explores alliance with Shinde Sena after talks stall. Candidates prepare for PMC elections amid uncertainty. Ajit Pawar group contacts Uday Samant, awaiting senior leadership approval for final decision.
Web Summary : पुणे: राकांपा गुटों की वार्ता विफल होने पर शिंदे सेना से गठबंधन की संभावना। उम्मीदवारों को तैयारी के निर्देश, उदय सामंत से संपर्क। अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व की मंजूरी पर निर्भर।